Fri, May 29, 2020 03:00होमपेज › Pune › युती न करताही भाजपला बहुमत शक्य

युती न करताही भाजपला बहुमत शक्य

Published On: Sep 20 2019 1:46AM | Last Updated: Sep 20 2019 1:44AM
पुणे : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची शिवसेनेसोबत युती झाली नाही तरीही भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असा दावा एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटने केला आहे. एमआयटीच्या वतीने राज्याच्या विविध भागांत केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आल्याचेही सांगण्यात आले आहे.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटच्या विद्यार्थ्यांनी 25 ते 29 ऑगस्टदरम्यान राज्यातील विविध भागांतील 30 मतदारसंघांचा दौरा करून मतदारांची मते जाणून घेण्यासाठी सर्व्हे केला. या सर्व्हेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटच्या प्रमुख डॉ. एस. एस. हरिदास यांनी युती न होताही भाजपला बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. यावेळी प्रा. महेश साने, डॉ. अमर जाधव उपस्थित होते. एमआयटीने केलेल्या सर्व्हेमध्ये 30 विधानसभा मतदारसंघांतील जवळपास 5 हजार मतदारांना 11 प्रश्‍न विचारण्यात आले. या प्रश्‍नांच्या उत्तरांत मिळालेल्या माहितीचे अवलोकन केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीला भाजप शिवसेनेशी युती न करता सामोरे गेला, तर राज्यात 176 जागा भाजपला मिळू शकतात. तर शिवसेनेला स्वबळावर 52 जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेसला 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 18 जागांवर विजय मिळू शकतो. बहुचर्चित वंचित बहुजन आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर मनसेला यावेळी खातेही खोलता येणार नाही, असेही सर्व्हेतून पुढे आल्याचे एमआयटीने सांगितले आहे.

एमआयटीच्या ओपिनियन पोलनुसार, भाजप संपूर्ण राज्यात 45 टक्के मते घेऊन 176 जागांसह सर्वात मोठा पक्ष असू शकतो. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला 31 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे भाजपच्या टक्केवारीत वाढ झालेली असताना शिवसेनेसह इतर पक्षांची मतांची टक्केवारी घटलेली आहे. यात शिवसेना 19 वरून 15 टक्के, काँग्रेस 18 वरून 14 टक्के आणि राष्ट्रवादी 17 वरून थेट 7.85 टक्क्यांवर घसरल्याचे निष्पन्‍न झाल्याचे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटने सांगितले आहे.

एमआयटीने केलेल्या सर्व्हेमध्ये नागरिक, पदाधिकारी आणि नेत्यांना ईव्हीएमवर प्रश्‍न विचारण्यात आले. त्यात 52 टक्के लोकांनी ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली आहे. खुद्द भाजपच्या 22 टक्के नेत्यांनीही ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत फेरफार होणे शक्य असल्याचे मत नोंदविल्याचे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटने सांगितले आहे.