होमपेज › Pune › एसटीने दरवाढ केल्याने आर्थिक नियोजन कोलमडणार

एसटीने दरवाढ केल्याने आर्थिक नियोजन कोलमडणार

Published On: Jun 17 2018 1:37AM | Last Updated: Jun 17 2018 12:53AMपुणे : प्रतिनिधी 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी गरीब किंवा मध्यमवर्गीय असून काहींचे तर हातावर पोट आहे. परंतु एसटीने तिकीट दरात तब्बल 18 टक्के वाढ केल्याने यातील बहुतांश प्रवाशांचे आर्थिक नियोजन कोलमडणार असून सर्वसामान्यांची असे बिरूद मिरवणारी एसटी या भाडेवाढीमुळे खरोखरीच सर्वसामान्यांची राहिली आहे का, अशा संतप्त भावना अनेक प्रवाशांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना शनिवारी व्यक्त केल्या. 

एसटीने वायफळ खर्च बंद करावेत. प्रत्येक आगारात कर्मचारी नेमून नेमक्या कोणत्या गाडीला गर्दी असते याची पाहणी करून त्याच मार्गांवर अधिकच्या गाड्या सोडाव्यात. गाड्या रिकाम्या गेल्याने एसटीच्या तोट्यात वाढ होत आहे, तो भरून काढण्यासाठी एसटीने तिकीट दरवाढ लागू केली आहे. डिझेल दरवाढीचे कारण यासाठी पुढे केले गेले आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आगारात खासगी बसगाड्यांचे चालक-वाहक सर्रासपणे धंदा करत असून एसटीचे प्रवासी ते पळवून नेत आहेत. महागाईची झळ एसटीलादेखील बसली आहे, यात दुमत नाही. परंतु तोटा नेमका कशामुळे होत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक माधव गोडबोले यांनी व्यक्त केली आहे. एसटीने ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलत दिली असून ती कमी करावी. त्यामुळे अन्य प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत असून ज्येष्ठ नागरिकांसाठी 20 टक्के सवलत असावी, असे मत सिद्धांत सोनवणे या प्रवाशाने व्यक्त केले आहे. 

एसटीने केलेली दरवाढ अन्यायकारक असून 18 टक्के भाडेवाढ करण्याऐवजी 8 ते 10 टक्के एवढी माफक दरवाढ करायला हवी होती. ही दरवाढ हळूहळू करायला हवी होती. मी आठवड्यातून दोन-तीनदा पुणे-सांगली-पुणे प्रवास करत असून दरवाढीपूर्वी या प्रवासासाठी हिरकणीला 340 रुपये मोजावे लागत होते. शनिवारपासून (दि. 16) मात्र त्यासाठी 404 रुपये मोजावे लागत असून तब्बल 64 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. अनेकांना यामुळे मानसिक धक्का बसला आहे. आमचे कंबरडेच मोडणार असून एसटीने ही तिकीट दरवाढ तातडीने रद्द करून अन्य पर्यायांचा विचार करावा, अशी प्रतिक्रिया स्वारगेट आगारातील तरुण प्रवासी परेश घाणेकर याने व्यक्त केली आहे.   

वाहकांची डोकेदुखी संपली

एसटीच्या दरवाढीबरोबरच पाच रुपयांच्या पटीने वाढ केली गेल्याने वाहकांची डोकेदुखी संपल्याचे चित्र शनिवारी दिसले. समजा एखाद्या ठिकाणी जाण्यास 132 रुपये तिकीट असेल तर 130 रुपयेच आकारले जाणार असून 133 रुपये असल्यास 135 रुपये अशी राउंडफिगर आकारण्यास शनिवारपासून सुरुवात केली असून वाहक व प्रवासी यांच्यात सुट्या पैशांवरून होणारे वाद कमी होणार असल्याचे सांगण्यात आले. नितीन लोहार या वाहकाने सांगितले की, आमच्याकडे एक रुपया सुटा द्यायला नसेल तर प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागायचे. बर्‍याचदा प्रवासी टोमणे किंवा शिव्या देखील हासडत असत. त्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवत होते. पीएमपीच्या धर्तीवर अडीच रुपयांच्या पुढे पाच रुपये आकारण्याचा निर्णय स्तुत्य असून यापूर्वीच हे पाऊल उचलायला हवे होते.