Wed, May 22, 2019 23:08होमपेज › Pune › सावधान पीएमपीएल इमारतीसह डेपोंची ‘अग्निसुरक्षा हवेतच’ 

सावधान पीएमपीएल इमारतीसह डेपोंची ‘अग्निसुरक्षा हवेतच’ 

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 1:16AMपुणे : नवनाथ शिंदे

शहरातील नागरिकांची प्रवासवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाला इमारत आणि बस डेपोंच्या फायर ऑडिटचा विसर पडला आहे. तब्बल सहा वर्षांपासून मुख्य इमारतीसह 13 बसडेपोंचे फायर ऑडिटच करण्यात आलेले नाही. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या टोलवाटोलवीमुळे इमारतीच्या फायर ऑडिटला कोलदांडा देण्यात आला आहे.

मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे तातडीने फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने 2012 मध्ये इमारत आणि डेपोंचे फायर ऑडिट केले होते. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना नियम 2009 नुसार शासकीस आणि निमशासकीय इमारतींचे दरवर्षी फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे. मात्र, सहा वर्षांच्या कालावधीनंतरही पीएमपी प्रशासनाने फायर ऑडिट कडे गांभीर्याने पाहिलेलेच नाही. पीएमपी मुख्य इमारत आणि 13 डेपो मिळून अवघे 114 फायर एक्सटिंशर उपलब्ध आहेत. महामंडळाकडे अग्निविरोधी यंत्रणा सक्षम नसल्यामुळे आणि इमारतीसहित डेपोंचे फायर ऑडिट न झाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम नसल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयास (आरटीओ) लागलेल्या सलग दोन आगीच्या घटनेत कागदपत्रांची राखरांगोळी झाली. पीएमपीच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर बस दुरुस्तीसहित विविध कामे केली जातात. शॉटसर्किट किंवा आग लागल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतीसहित डेपोंचे  फायर ऑडिट करून घेण्यास प्रशासनास मुर्हूत कधी काढणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

अधिकारी, पदाधिकारी अनभिज्ञ

पीएमपी इमारतीसहित 13 डेपोंचे ऑडिट झाले की नाही, याबद्दल प्रशासनाकडे खात्रीदायक माहिती उपलब्ध नव्हती. शासनाच्या आदेशानंतर 2012 मध्ये फक्त एकदाच फायर ऑडिट करण्यात आले होते. त्यानंतर सहा वर्षांत एकही अधिकारी, पदाधिकारी, व्यवस्थापकीय संचालकांचे फायर ऑडिट करण्याकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.