Thu, Apr 25, 2019 07:59होमपेज › Pune › राज्यामध्ये थंडीची लाट अधिक तीव्र

राज्यामध्ये थंडीची लाट अधिक तीव्र

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:11AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

राज्यात गेल्या आठवडाभरापासून आलेली थंडीची लाट गुरुवारी अधिक तीव्र बनली. अनेक भागांमध्ये रक्‍त गोठवणार्‍या थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला. विदर्भातील गोंदियात सर्वांत कमी 7.6 अंश सेल्सियस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. नाशिक 8.6, पुणे 9.4, जळगाव 8.6, कोल्हापूर 14.3, महाबळेश्‍वर 13, सांगली 12.6, सातारा 10.5, सोलापूर 11.9, औरंगाबाद 10.4, नांदेड 10, नागपूर 8.4, मुंबई 16, रत्नागिरी 16.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 

विशेष बाब म्हणजे यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच कोकण व मुंबईही गारठलेली पहायला मिळाली. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. 

सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून तेथून राज्याच्या दिशेने बोचरे वारे वाहत आहेत. राजधानी दिल्लीत गुरुवारी 7 अंश सेल्सियस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. पुढील 3-4 दिवस राज्यात थंडीची लाट तीव्रच राहणार असून काही ठिकाणचा किमान तापमानाचा पारा 5 अंशांपर्यंत खाली उतरू शकतो, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. 

पुण्यातही पारा गेला 10 अंशांच्या खाली

थंडीचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र, यंदाच्या हंगामात पुणे शहराचे किमान तापमान गुरुवारी पहिल्यांदा 10 अंशांच्या खाली उतरल्याने पुणेकर चांगलेच कुडकुडले. पुण्यात (शिवाजीनगर) गुरुवारी हंगामातील नीचांकी 9.4 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. तर, पाषाण येथे पारा तब्बल 8.9 अंशांपर्यंत खाली घसरला. हे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल 1.2 अंशांनी कमी आहे. पहाटेच्या वेळी थंडीची तीव्रता अधिक असल्याने रात्री व पहाटे शेकोट्या पेटविल्याचे चित्र दिसले. दरम्यान, पुढील 2-3 दिवसांत शहर व परिसराच्या किमान तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.