Wed, Nov 14, 2018 13:03



होमपेज › Pune › पुण्यासह परिसरात वादळी पावसाचा इशारा

पुण्यासह परिसरात वादळी पावसाचा इशारा

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 1:13AM



मुंबई / पुणे : प्रतिनिधी

गेले 2-3 दिवस कर्नाटकात मुक्काम ठोकलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) रविवारी किंचित प्रगती केली असून, तो गोव्याच्या वेशीवर पोहोचला आहे. येत्या 48 तासांत मान्सून गोव्यात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली असून, येत्या 48 तासांत रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि मराठवाड्यातही वळवाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यात 7 जूनपासून मान्सून सक्रिय होणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 24 तासांत संपूर्ण ईशान्य भारत मान्सूनने व्यापला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. मान्सूनची उत्तर सीमा रविवारी शिराळी, हस्सन, म्हैसूर, कोडाईकॅनाल, तूतीकोरीन अशी होती. 

6 जून ते 8 जूनदरम्यान महाराष्ट्राचा किनारपट्टी भाग, गोव्यातील पावसाचे प्रमाण वाढणार असल्याची माहिती देण्यात आली. पुढील 3-4 दिवस दुपारनंतर राज्यभर मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मान्सूनच्या प्रगतीविषयी भारतीय हवामान खात्याचा पुढचा अंदाज 10 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

विजांचा कडकडाट

येत्या 24 तासांत पुणे शहर परिसरातील धायरी, खेड-शिवापूरसह जिल्ह्यातील नसरापूर, नीरा, लोणंद, फलटण येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तविली आहे. सातारा, वाई, औंध, सांगली जिल्ह्यातील बुधगाव, मौजे डिग्रज तसेच चांदोली धरण क्षेत्रातही विजांचा धोका आहे. उपग्रहातील छायाचित्रानुसार महाड, चिपळूण, रत्नागिरी, बारामती, सोलापूर व सातारा तालुक्यातील काही भाग वगळता कोकण, पुणे-मुंबईसह संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वत्र आकाशात ढगांची गर्दी आहे.

पेरण्यांबाबत संयम ठेवण्याचे राज्य सरकारचे आवाहन

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने काही भागात पेरण्यांसाठी आश्‍वासक वातावरण निर्माण झाले असले, तरी राज्य सरकारने शेतकर्‍यांना संयम बाळगण्याचा सल्ला यापूर्वीच दिला आहे. मान्सून अद्याप सक्रिय झाला नसल्याने आधीच पेरण्या केल्या, तर त्या वाया जाण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने पेरण्यांना पूरक वातावरण तयार होईपर्यंत पेरण्या करू नयेत, असे राज्य सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे.