Wed, Apr 24, 2019 11:35होमपेज › Pune › रेड झोनचा प्रश्‍न सोडविणार’

रेड झोनचा प्रश्‍न सोडविणार’

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:46PM

बुकमार्क करा

पिंपरी :  प्रतिनिधी

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला दिघी, भोसरी, रुपीनगर, तळवडे येथील रेड झोनचा प्रश्‍न आणि हडपसरच्या कोंढवा, लुल्लानगर येथील बकरी हिल येथील संरक्षण विभागाच्या परिसरातील पाण्याच्या पाइपलाइनसाठी परवानगीसंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन हे प्रश्‍न सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. 

संसद अधिवेशन सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर  खा. शिवाजीराव आढळराव पाटील व मावळचे खा. श्रीरंग बारणे यांनी संरक्षणमंत्री सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने दोन्ही विषय समजून घेतले; तसेच संबंधित अधिकार्‍यांना समक्ष बोलावून याविषयी गांभीर्याने लक्ष घालण्याचे व संपूर्ण माहिती सादर करून बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. रोडझोन प्रश्‍नाबाबत खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आजवर केलेला पाठपुरावा आणि स्थानिक जनतेच्या रेड झोनची हद्द 60 मीटर  कमी करण्याच्या मागणीबाबत संरक्षणमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये सन 2013 मध्ये लोकसभेच्या पिटीशन कमिटीने केलेला दौरा, त्याचप्रमाणे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी घेतलेली सकारात्मक भूमिका आदींची माहिती खा. शिवाजीराव आढळराव पाटील व खा. श्रीरंग बारणे यांनी संरक्षणमंत्री सीतारामन यांना दिली. 

हडपसरमधील कोंढवा, लुल्लानगर येथील बकरी हिल परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकण्यास संरक्षण विभागाची परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने, नागरिकांना अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याकडे  आढळराव पाटील यांनी संरक्षणमंत्री सीतारामन यांचे लक्ष वेधले. गेली अनेक वर्षे या कामाच्या परवानगीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे आपण पाठपुरावा करीत असून,  संरक्षण विभागाकडून परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याने सुमारे लाख ते दीड लाख नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी महापालिकेला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बकरी हिल परिसरात संरक्षण विभागाच्या जागेतून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यास तत्काळ परवानगी मिळावी, अशी विनंती आढळराव पाटील यांनी संरक्षणमंत्री यांना केली. 

रेड झोन प्रश्‍नाबाबत खा. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, हा प्रश्‍न सोडवताना प्रत्येक वेळी आश्‍वासक वातावरण तयार होत असतानाच कधी संरक्षणमंत्री, तर कधी दक्षिण कमांडचे प्रमुख बदलतात. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन मंत्री, नवीन दक्षिण कमांडचे प्रमुख यांना हा प्रश्‍न समजावून सांगावे लागतात. पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री पदाची धुरा सांभाळताच हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती; पण रेड झोनबाधितांच्या दुर्दैवाने त्यांनी पुन्हा गोव्यात मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळण्याचा निर्णय घेतला. परिणामी पुन्हा हा प्रश्‍न सुटण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे आता हा प्रश्‍न सोडविण्यासाठी नव्याने सुरुवात करावी लागली आहे; मात्र आपण हा प्रश्‍न सोडविण्यासाठी चिकाटीने पाठपुरावा करणार असल्याचे आढळराव पाटील म्हणाले.