Wed, May 22, 2019 06:52होमपेज › Pune › भाजपपासून अलिप्त राहणार 

भाजपपासून अलिप्त राहणार 

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 11:29PMपिंपरी : प्रतिनिधी

देशात बहुजन समाजावर अन्याय वाढला आहे. दलित समाजाला सरकारी नोकरीत पदोन्नती थांबली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल झाल्याने कायदा पांगळा झाला आहे. शहरात भाजपाची सत्ता येऊन वर्ष झाले, मात्र कचरा, पाणी यासारखे अनेक प्रश्न तडीस गेले नाहीत. या पापांचा मला धनी व्हायचे नाही, असे सांगत भाजपपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वेळ पडल्यास जनमत अजमावून नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचीही आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत आरपीआय चे ओव्हाळ हे भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडून आले आहेत. मात्र दलित, बहुजन समाजाच्या स्वाभिमानाला धक्का पोचविणार्‍याबरोबर आपण यापुढे वाटचाल करू शकत नाही असे ते म्हणाले.आपण भाजपच्या चिन्हावर आरपीआयचे उमेदवार म्हणून निवडून आलात मग नक्की कोणापासून अलिप्त होणार असे विचारले असता संविधानाच्या आड येणारांना आपला विरोध असेल मला दलित कार्ड व्हायचे नाही ज्यांना व्हायचंय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे ते म्हणाले.येत्या विधानसभेला भाजप व आरपीआय युती असेल, मतदारसंघ आरपीआयला गेला तर तुम्ही त्या उमेदवारांच्या विरोधात लढण्याची तयारी केली आहे का असे विचारले असता त्यांनी आपण तीही तयारी ठेवली असल्याचे सांगितले.या वेळी सुरेश निकाळजे, बाबा सरोदे, मारुती जकाते, गौतम गायकवाड हेही उपस्थित होते.