Tue, Jul 23, 2019 04:01होमपेज › Pune › एप्रिलपासून ओला कचरा स्वीकारणार नाही

एप्रिलपासून ओला कचरा स्वीकारणार नाही

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 21 2018 12:35AMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील दररोज 100 किलोंपेक्षा जास्त ओला कचरा करणार्‍या हौसिंग सोसायट्यांकडून तो 1 एप्रिल 2017 पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वीकारण्यात येणार नाही. ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था सोसायटीला करणे बंधनकारक असणार आहे. केवळ सुका कचरा स्वीकारला जाणार आहे. 75 पेक्षा जास्त सदनिका असणार्‍या सोसायट्यांचा यामध्ये समावेश आहे. 

हौसिंमग सोसायट्यांबरोबरच हॉटेल्स, मंगल कार्यालये, खानावळ, वसतिगृह, उपाहारगृह, शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई व कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी हे बंधन महापालिकेने घातले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा नियम करण्यात आला आहे. या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने संबंधितांना याबाबतचे जनजागृतीपर पत्र पाठविण्यात आले आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख मनोज लोणकर यांनी सांगितले.  

घनकचरा व्यवस्थापन 2016 मधील तरतुदीनुसार ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे. निर्माण झालेल्या ओला कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करून तो जिरवावा, असे बंधन महापालिकेने घातले आहे. दररोज 100 किलो ओला कचरा निर्माण होणार्‍या हौसिंग सोसायट्या व इतर आस्थापनाकडून 1 एप्रिलपासून तो कचरा स्वीकारला जाणार नाही. या संदर्भात संबंधित सोसायट्या व आस्थापनांनी खत निर्मिती प्रकल्पाची व्यवस्था करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या सोसायट्या व आस्थापनांकडून केवळ सुका कचरा महापालिका स्वीकारणार आहे, असे लोणकर यांनी सांगितले.

ओला कचरा : घरातील कचरा, भाजी व फळांची साले, उरलेले अन्न, अंड्याची टरफले, कुजलेली फळे व भाज्या, मांसाहारी खाद्यपदार्थ, शहाळे, हार, फुले, निर्माल्य, पालापाचोळा, डहाळी, सुकलेली पाने, गवत

सुका कचरा : प्लास्टिक पिशव्या व वस्तू, बाटल्या, वर्तमानपत्रे, मासिके, स्टेशनरी, कागदी बॉक्स, ट्रेट्रोपॅक, कागदी कप, प्लेट, धातू, धातूचे बॉक्स, धातूचे कंटेनर, डबे, काचेच्या बाटल्या, रबर, थर्माकोल, लाकूड व चिनी मातीच्या वस्तू.