Tue, Jul 07, 2020 22:00होमपेज › Pune › कार्यालय मिळणार पण खुर्ची टिकणार का !

कार्यालय मिळणार पण खुर्ची टिकणार का !

Published On: Jun 18 2018 1:20AM | Last Updated: Jun 18 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्‍यांसह, पक्षनेत्यांना नविन इमारतीत प्रशस्त कार्यालय मिळणार आहे. येत्या गुरूवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते या नविन इमारतीचे उद्घाटन होऊन, या पदाधिकार्‍यांचा कार्यालय प्रवेश होईल; मात्र एकिकडे नविन कार्यालय मिळणार असतानाच महापालिकेत पदाधिकारी बदलांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे कार्यालय मिळणार असले, तरी खुर्ची टिकणार का याची धास्ती सत्ताधारी भाजप पदाधिकार्‍यांना लागली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपला सव्वा वर्षाचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे.  सत्तेवर आल्यानंतर महापौर आणि सभागृह नेते या पदाधिकार्‍यांना सव्वा वर्षाचा कालावधी मिळणार की, त्यांनात्यांच्या कार्यकाळ पुर्ण होईपर्यंत संधी दिली जाणार, हे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता सव्वा वर्षानंतर या दोन्ही पदाधिकार्‍यांच्या बदलांची चर्चा सुरू झाली आहे. काही इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. महापौर आणि सभागृह नेते बदलले जाणारम, असे पक्षातील काही मंडळी सांगत असताना, काही मंडळी मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्टपणे सांगत आहेत. या सगळ्यावर पक्षनेतृत्वाकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या बदलांबाबत सध्या तरी संभ्रमाचे वातावरण आहे. 

एकिकडे महापालिकेत ही अवस्था असताना, दुसरीकडे महापालिकेच्या नविन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन येत्या गुरूवारी (दि. 21) उपराष्ट्रपती व्यंकया नायडु यांच्या हस्ते होत आहे. या नविन इमारतीत सुसज्ज अशा सभागृहासह सर्व पदाधिकारी आणि पक्षनेत्यांना प्रशस्त कार्यालय मिळणार आहे. विशेष म्हणजे या कार्यालयांची, तसेच इतर अनेक कामे अर्धवट अवस्थेत असतानाही उद्घाटनाचा गडबड सुरू आहे. 

ही कामे युध्दपातळीवर पुर्ण करण्याचे प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून सुरू आहेत. उद्घाटनानंतर लगेचच महापौर मुक्ता टिळक नविन कार्यालयात स्थलांतरीत होणार आहेत. तर टप्याटप्याने इतर पदाधिकार्‍यांना कार्यालये मिळणार आहेत; मात्र कामे अर्धवट असतानाही ‘उद्घाटनाची लगीनघाई’ का सुरू करण्यात आली आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.यानिमित्ताने महापालिकेतील संभाव्य बदल आणि इमारतीचे उद्घाटन यांचा एकमेकांशी संबध जोडला जात आहे. पदधिकारी बदलले जाणार असल्याने, त्यांच्याच कार्यकाळात उभ्या राहिलेल्या इमारतींचे उद्घाटन व्हावे यासाठीच ही ‘लगीन घाई’ केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकिकडे सत्ताधारी पदाधिकार्‍यांना नविन कार्यालय मिळणार असले, तरी त्यामधील खुर्चीवर मात्र सध्यातरी टांगती तलवारच दिसते आहे. त्यामुळे आता नविन कार्यालये कोणासाठी ‘शकुना’चे आणि कुणासाठी ‘अपशकुना’चे ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

भाजपकडून सावध पवित्रा

महापौर बदलाची चर्चा सुरू असली तरी, त्यांना बदलण्यासाठी ठोस असे कारण नाही. सव्वा वर्षाचा कालावधी हा निकष धरला, तरी महापौरपदासाठी पक्षाकडे तेवढ्या ताकदीचा आणि महापौरपदाचा कार्यभार सांभाळू शकेल, असा उमेदवार नाही. त्यामुळे या बदलाबाबत पक्षनेतृत्व सांशक असल्याचे सांगण्यात येत आहे. सभागृह नेते आणि काँग्रेसचे गटनेते यांच्यात झालेल्या वादावादीच्या प्रकारानंतर, आता सभागृह नेते बदलाचा निर्णय घेतला गेला, तर त्याचे श्रेय काँग्रेस घेईल अशीही भिती आहे. त्यामुळे पक्षाकडून सद्यातरी सावध पवित्रा घेतला जात आहे.