Thu, Apr 25, 2019 14:19होमपेज › Pune › पुन्हा एकदा उजाळणार ‘शिवकाळ’..!

पुन्हा एकदा उजाळणार ‘शिवकाळ’..!

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

सोळाव्या शतकातला रणधुमाळीचा कालखंड..., सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील घनदाट झाडी..., अनेक राजघराण्यांच्या एकमेकांवर सत्ता प्राप्तीसाठीच्या सुरू असलेल्या जोरदार स्वार्‍या... मात्र, याच कालखंडात समाजहित, स्वराज्य निर्मितीच्या ध्येयासाठी उगवलेला तळपता सूर्य आणि याच सूर्याने जनतेसाठी पुकारलेल्या लढ्याचे विहंगम दृश्य, असा हा अलौकिक ‘शिवकाळ’ नुसतं ऐकला तरी अंगावर शहारा येतो. हाच ‘शिवकाळ’ पुण्यात ‘शिवसृष्टी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा उजळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसृष्टीचा प्रस्ताव रखडला होता. अखेर त्याला मुहूर्त लागला असून, आता काही महिन्यांतच पुणेकरांना शिवसृष्टीच्या माध्यमातून शिवकाळाची अनुभूती घेता येणार आहे. चांदणी चौकाजवळील जैववैविध्य आरक्षण असलेल्या उद्यानाच्या (बीडीपी) जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित शिवसृष्टीच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढत चांदणी चौकाजवळील बीडीपीची आरक्षित 50 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. शिवसृष्टीसंदर्भात काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत सादरीकरण केले होते. त्यात गरजेनुसार बदल करून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.

जन्मस्थळ, समाधीस्थळासह 9 ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा ऐतिहासिक प्रवास खूपच रोमांचकारी, थरारक होता. त्या इतिहासाला महाराष्ट्रात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे भविष्यात उभारण्यात येणारी शिवसृष्टी तरुणांसाठी नक्‍कीच प्रेरणादायी ठरेल. या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ व समाधीस्थळासह 9 किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. यात शिवरायांचे शिवनेरी, स्वराज्याचे तोरण बांधलेल्या तोरणागडाचे प्रवेशद्वार, प्रतापगडावरील भवानी मातेचे मंदिर, बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने पावन झालेली पावनखिंड, सिंहगडावरील पुणे दरवाजा, अफजल खान वधाच्या तंबूची प्रतिकृती, रायगडावरील समाधिस्थळ यांच्या प्रतिकृती हे शिवसृष्टीचे आकर्षण असेल.

शिल्पाकृतींमधून थरारक प्रसंग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर अनेक संकटे आली. मात्र, त्या संकटांशी त्यांनी न डगमगता दोन हात केले. त्यातील काही थरारक प्रसंग शिवसृष्टीत शिल्पाकृतींच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहेत. यात अफजल खानाचा वध, आगर्‍याहून सुटका, लाल महालातील शाहिस्तेखानाची तीन बोटे छाटलेला प्रसंग, पन्हाळ्याच्या वेढ्यातून घेतलेल्या सुटकेचा प्रसंग यांसारखे प्रसंग मांडण्यात येणार आहेत.

पर्यटकांना होणार शिवकालीन ग्रामीण जीवनाचे दर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ग्रामीण जीवनाचा भास होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी भव्य असे थीम डिस्ट्रिक उभारण्यात येणार आहे. त्यात पर्यटकांना सोळाव्या शतकातील जीवनाचे दर्शन घडणार आहे. या प्रकल्पात भव्य अशा शिवकालीन प्रवेशद्वारातून आत प्रवेश करता येणार असून, भोवताली चिरेबंदी दगडाची तटबंदी असणार आहे.