Fri, Jul 19, 2019 22:27होमपेज › Pune › फेसबुक लाईव्ह ठरेल उचित माध्यम?

फेसबुक लाईव्ह ठरेल उचित माध्यम?

Published On: Jan 16 2018 2:15AM | Last Updated: Jan 16 2018 12:28AM

बुकमार्क करा
पुणे मंडई : सुनील जगताप

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार मोठे असून, त्यामध्ये समस्याही दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. या समस्या सोडवित असताना विविध घटकांची मिळणारी साथ, अधिकार्‍यांची कार्यक्षमता आणि निर्णय घेताना लागणारी कठोरता या सर्वांचाच मेळ बसणे गरजेचे असते. बाजार आवारात असणार्‍या समस्या सोडविण्यासाठी बाजार समितीने आणखी एक पाऊल टाकत ‘फेसबुक लाईव्ह’ उपक्रम सुरू केला आहे. सर्व सामान्य शेतकरी आणि ग्राहकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम आगामी काळात कितपत उचित ठरेल हा मोठा प्रश्‍न आहे. 

पुणे जिल्ह्यासह आशिया खंडात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. या बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ कार्यरत असून, डिसेंबरमध्ये सहा महिन्यांची पुन्हा मुदतवाढ मिळालेली आहे. या बाजार समितीमध्ये काम करीत असतानाही आधुनिकतेची कास पकडत शेतकर्‍यांसाठी हायटेक सोयी-सुविधा पुरविण्याकडे प्रशासकीय मंडळाचा कल दिसून येतो. हीच हायटेक उपक्रमाची कास धरत बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आराखड्याबाबत माहिती देणार असून, त्याबाबत काही सूचना असतील तर त्या विचारात घेतल्या जाणार आहेत. बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाने यापूर्वीच मुख्य बाजार आवाराच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. त्याला सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांची मान्यता दिसत असून, सध्या बाजारातील विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. या नवीन प्रस्तावित बाजाराबाबतही या फेसबुक लाईव्हमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. 

अशा प्रकारचा सोशल मीडियातून संवाद साधण्याचा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रथमच उपक्रम असल्याचा दावाही बाजार समितीच्या सभापतींनी केला आहे. वास्तविक पाहता सोशल मीडियाची कास पकडणार्‍या केंद्राने पायाभूत सुविधांकडे ज्या प्रमाणात दुर्लक्ष केल्याची तक्रार केली जात आहे. त्याच धर्तीवर आता बाजार समितीनेही सोशल मीडियाची कास पकडल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम स्तुत्य असला तरी पायाभुत सुविधा पुरविणे प्रशासकीय अधिकार्‍यांचेही काम आहे. परंतु, प्रशासनाच्या पातळीवर अशा प्रकारची कामे होताना दिसून येत नाही. त्यामुळे एका बाजूला बाजार समितीचे पदाधिकारी बाजार आवार सुधारण्यासाठी ज्या प्रमाणात धडपड करीत आहेत, त्या प्रमाणात मात्र अधिकार्‍यांची साथ मिळत नसल्याचे चित्र बाजारात दिसून येते. 

समितीच्या प्रशासकीय मंडळाने काढलेला आदेश पाळण्यासही काही अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या हायटेक प्रचाराला अधिकार्‍यांकडून कितपत साथ मिळेल, हा प्रश्‍नही महत्त्वाचा आहे. गेल्या आठवड्यात फेसबुक लाईव्ह उपक्रमात तीन हजार नागरिकांनी पाहिले असून काही जण त्यावर सक्रियही झाले असल्याची माहिती सभापती दिलीप खैरे यांनी दिली आहे. 
वास्तविक पाहता अशा प्रकारच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बाजारातील इतर घटकांचे समाधान होईल का, सोशल मीडियातून मिळालेल्या सूचनांचे पालन अधिकारी वर्ग करेल आदी अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत असून, आगामी काळात त्याचे परिणामही दिसून येतील.