Sun, Apr 21, 2019 06:31होमपेज › Pune › रणपिसेंच्या उमेदवारीने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का?

रणपिसेंच्या उमेदवारीने काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार का?

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 1:21AMपुणे : हिरा सरवदे

बोलण्याचे कौशल्य, अभ्यास, सत्ताधार्‍यांना अंगावर घेण्याची ताकद अशा गोष्टींचा विचार करत काँग्रेसच्या कोट्यातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र विधन परिषदेतून निवृत्त होत असलेले विद्यमान सदस्य आणि परिषदेतील काँग्रसेचे गटनेते शरद रणपिसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने हा अंदाज फोल ठरला आहे. विधान परिषदेवर पाठविलेल्या आजवरच्या काँग्रेस नेत्यांचा जनाधार आणि शहर काँग्रेसच्या कार्यक्रमातील त्यांचा सहभाग आणि दिलेले योगदान नगण्यच आहे. या पार्श्‍वभूमीवर रणपिसे यांनी पुन्हा मिळालेली विधान परिषदेची उमेदवारी शहर काँग्रेसला नवसंजीवनी देणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला होत आहे. 

विधानपरिषदेचे 11 सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे या काँग्रेसच्या तीन विधान परिषदेतील सदस्यांचा समावेश आहे. पक्षाच्या आमदारांची संख्या विचारात घेऊन आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत घरून काँग्रेसने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये शरद रणपिसे आणि यवतमाळचे वजाहत मिर्झा यांचा समावेश आहे. रणपिसे यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा पक्षीय पातळीवर सुरू होती. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे यांनी उमेदवारीसाठी शर्तींचे प्रयत्न सुरू होते. मात्र पक्षनिष्ठा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध, स्वच्छ प्रतिमा, पक्षातील सर्व नेत्यांशी व पदाधिकार्‍यांशी असलेले जिव्हाळ्यांचे संबंधामुळे पक्षश्रेष्ठींनी सर्वांनाच धक्का देत रणपिसे यांच्या नावाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे. या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख दावेदारी सांगितली जात होती.

मात्र, युती शासनाच्या काळात अपक्षांचे नेते म्हणून भूषविलेले मंत्रीपद, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांच्याकडून पत्करलेल्या पराभवानंतर पक्षांच्या कार्यक्रमांकडे फिरवलेली पाठ आणि विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या वेळी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर पाटील यांचे विधानपरिषदेचे तिकीट कापले गेल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागा वाटपप्रसंगी होणारी अडचण ओळखून, ती दूर करण्याच्या हेतूने हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली जावी, यासाठी राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले जात होते. मात्र त्याला यश येऊ शकले नाही. विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर मागील सहा वर्षात शरद रणपिसे यांनी पक्षाला उभारी मिळेल, अशी भरीव कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांना महापालिकेतील पदाधिकार्‍यांचा विरोध होता. मात्र रणपिसे यांच्या नेतृत्वातील जवळिकीमुळेच त्यांची निवड झाली.