Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Pune › काँग्रेसला सक्षम नेतृत्व मिळणार का?

काँग्रेसला सक्षम नेतृत्व मिळणार का?

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:51PM
पिंपरी : जयंत जाधव

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलल्या पिंपरी-चिंचवड शहराकडे पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करतात, ते पाठबळ देत नसल्याने पक्ष वाढणार कसा अस सवाल करत काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (दि.8) पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.त्यानंतर दुसर्‍या दिवशी पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे देऊन साठे यांना पाठिंबा दर्शविला. साठे यांच्यावर झालेला अन्याय व शहरातील काँग्रेसला मिळत नसलेली ताकद यातून हे राजीनामा प्रकरण घडले. त्यामुळे आता बिकट परिस्थितीत शहर काँग्रेसला सक्षम नेतृत्व मिळणार का? काँग्रेसचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दादर येथील टिळक भवन येथे रविवारी (दि. 8) झालेल्या जिल्हा पदाधिकार्‍यांच्या व्यथा मांडून साठे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाच्या अन्य पदाधिकार्‍यांनीही आपले सामूहिक राजीनामे दिले. या पदाधिकार्‍यांमध्ये प्रदेश पातळीवरील व शहर-जिल्हा पातळीवरील दिग्गजांचा समावेश आहे. या राजीनाम्यांमुळे शहर काँग्रेसमध्ये खळबळ उडणे साहजिकच आहे.साठे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर शहरातील कार्यकर्त्यांची व्यथा मांडली. त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. त्यामुळे आमच्यावर असलेल्या जबादारीतून मुक्त करुन आमचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती राजीनामा पत्रात केली आहे. तसेच, पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करत पुढील काळात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहू, असेही म्हटले आहे. यावरुनच साठे यांच्या सक्षम संघटनाची झलक दिसून येते. शहरातील नेतृत्व दिवंगत माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.रामकृष्ण मोरे यांच्याकडे असताना पक्षाने तीन वेळा पुर्ण सत्ता व  एक वेळा राष्ट्रवादीसोबत बरोबरीने सत्तेत सहभाग घेतला होता. 2002 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 38 तर काँग्रेसच्या 34 जागा आल्या होत्या. यावरुन शहरात काँग्रेस किती सक्षम होती याचा प्रत्यय येतो ; परंतु त्यानंतर शहर काँग्रेसचे नेतृत्व काही काळ माजी खासदार सुरेश कलमाडी व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे गेले. त्यानंतर पक्ष बिकट परिस्थितीत असताना साठे यांच्याकडे शहर-जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. 

साठे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढीसाठी जनतेच्या प्रश्‍नांवर, विविध विषयांवर आंदोलने झाली. तसेच; पक्षाचे कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात झाले. याची दखल प्रदेश पातळीवर घेवून त्याचे कौतुकही झाले. परंतु; प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड शहर-जिल्ह्याला ताकद देताना सातत्याने अन्यायच झाल्याचे दिसून आले आहे. पुणे  शहरात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना गेल्या काही वषार्ंत 6 वेळा विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्या तुलनेत पिंपरी-चिंचवडला गेल्या 40 वषार्ंत एकदाही संधी मिळालेली नाही. प्रा. मोरे पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व करत असले तरी ते जिल्ह्याचे नेते म्हणून गणले जात होते. 

राहुल गांधी यांचे खंदे समर्थक असणार्‍या साठे यांनी 25 वर्षांत एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशा विविध स्तरावर काम केले आहे. हे काम करत असताना त्यांना अन्य पक्षांकडून महापौरपदाचे गाजर दाखवून आमंत्रणेही आली परंतु; ते कायम काँग्रेसचे निष्ठावंत राहिले. साठे यांचे नेतृत्व सर्वांना बरोबर घेवून जाणारे असताना पक्षाने त्यांना विधान परिषदेसारख्या मोठ्या पदाची संधी देताना कायम डावलले. 

यवतमाळचे वजाहत मिर्झा हे साठे यांच्यापेक्षा पक्षात 10 वर्षे कनिष्ठ आहेत. आ. शरद  रणपिसे यांना सलग तिसर्‍यांदा विधान परिषदेवर संधी मिळाली आहे. या अगोदर ते दोन वेळा विधानसभेवर निवडून आले होते. ज्या पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची वाताहात झाली आहे तेथे पक्षाला ताकद देवून पक्ष वाढविण्यासाठी खर्‍या अर्थाने निर्णय घेण्याची गरज होती. नेमके येथेच प्रदेश काँग्रेसचे धोरण चुकल्याचे दिसून येते. प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाने वेळोवेळी साठे यांना ताकद देण्याचे आश्‍वासन दिले होते ; परंतु पदरात काहीच दिले नाही. त्यामुळे उद्विग्न होवून साठे व त्यांच्या समर्थक पदाधिकार्‍यांनी राजीनामे देणे सहाजिक आहे. अशा परिस्थितीत आता प्रदेश व राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व काय निर्णय घेते याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.