Thu, Jun 20, 2019 14:48होमपेज › Pune › पत्नीच्या मृतदेहाला त्याने लिपस्टिक लावून सजविले!

पत्नीच्या मृतदेहाला त्याने लिपस्टिक लावून सजविले!

Published On: Apr 27 2018 1:06AM | Last Updated: Apr 27 2018 12:44AMपुणे/धायरी : प्रतिनिधी 

चारित्र्याच्या संशयावरून आधी त्याने पत्नीला मारहाण केली. नंतर छताच्या पंख्याला तिला फाशी देऊन तिचा खून केला आणि नंतर तिच्या मृतदेहाला सजविताना त्याने तिला लिपस्टिक लावले, कुंकू लावले, एवढेच काय त्याने तिला नवी साडीही नेसवली आणि नातेवाइकांना मोबाईलवर ‘मेसेज’ पाठवून त्याने या कृत्याची माहितीही दिली! ही खळबळजनक घटना  नर्‍हे  येथील मानाजीनगरमध्ये गुरुवारी सकाळी घडली.

झाल्या प्रकारानंतर नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. कोमल राहुल हंडाळ (वय 22) असे खून झालेल्या या दुर्दैवी महिलेचे नाव आहे़  तिचा पती राहुल राजेश हंडाळ (23, रा़  अंकुश पॅलेस, कुटे मळा, मानाजीनगर, नर्‍हे) याला सिंहगड रोड पोलिसांनी डेक्कन येथील नदीपात्रातून अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल ही एका खासगी रुग्णालयात साफसफाईचे काम करीत होती़  राहुलबरोबर तिचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. राहुल हा दारूच्या आहारी गेला होता. शिवाय काहीच कामधंदा करत नसे. दरम्यानच्या काळात राहुलला पनवेल येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच तो पुन्हा घरी आला. मात्र, त्यानंतर कोमलचे काही पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला येऊ लागला. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. त्यानंतर ती कर्वेनगर येथे माहेरी राहण्यास गेली.  परंतु राहुलने तिला आता आपली भांडणे होणार नाहीत, असे सांगत दोन दिवसांपूर्वी पुन्हा घरी घेऊन आला होता. 

गुरुवारी पहाटे दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यावेळी राहुलने कोमलला मारहाण करत, गळा आवळून तिचा खून केला. एवढेच नाही तर तिला सिलिंगच्या पंख्याला लटकवले. त्यानंतर तिच्या मृतदेहाला लिपस्टिक लावून, नवीन साडी नेसवून, गळ्यात मंगळसूत्र घातले आणि मृतदेह सोडून सकाळी तो घरातून बाहेर पडला़  त्याने तिच्या नातेवाईकांना ‘मेसेज’ व फोन करून, ‘तिने मला धोका दिला, मी तिला फाशी देऊन तिचा खून केला आहे’, असे सांगितले. त्यानंतर कोमलच्या नातेवाईकांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जाऊन याची माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी राहुलला डेक्कन येथील नदीपात्रानजीक ताब्यात घेऊन अटक केली आहे.