Fri, Mar 22, 2019 07:56होमपेज › Pune › बेदम मारहाण करून पत्नीचा खून

बेदम मारहाण करून पत्नीचा खून

Published On: Apr 27 2018 1:06AM | Last Updated: Apr 27 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी 

मुलांना घरी येण्यास उशीर झाल्याने त्यांना घरात घ्यायचे नाही, असे सांगूनही पत्नीने मुलांना घरात घेतल्याच्या कारणावरून तिला बेदम मारहाण करून, तिचा खून केल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास धनकवडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. 

सुधा रवी केसरी (45, धनकवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रवी नंदलाल केसरी (55, धनकवडी) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा संदीप रवी केसरी (24, धनकवडी) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

रवी केसरी हा रिक्षाचालक आहे. सुधा केसरी या घरकाम करतात. संदीप व पिंकी ही त्यांची मुले बुधवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री त्यांना घरी येण्यास उशीर झाला. त्यामुळे रवी केसरी याने दोघांना घरात घेऊ नको, असे पत्नी सुधा यांना सांगितले होते. मात्र, सुधा यांनी दार उघडून दोघांना घरात घेतले. या कारणावरून राग आल्याने रवी केसरी याने सुधा व मुलगा संदीप यांना शिवीगाळ केली; तसेच सुधा यांना डोक्यावर स्टीलच्या झार्‍याने मारहाण करुन ढकलून दिले.

त्यानंतर त्यांचे डोके जमिनीवर, भिंतीवर जोरात आपटून त्यांना जखमी केले. त्यानंतर संदीप याच्या डाव्या हातावर चावून, मानेवर मारहाण केली, तसेच त्याच्या बहिणीचे डोके काचेवर आपटून तिलाही मारहाण केली. या घटनेत सुधा केसरी या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मुलगा संदीप याने भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रवी केसरी याला अटक केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.