Thu, Jul 18, 2019 00:02होमपेज › Pune › देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांची केंद्रीय मंत्री गडकरींकडे मागणी

पालखी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:46AMदेहूरोड : वार्ताहर

देहू ते देहूफाटा हा सुमारे चार किलोमीटरचा मार्ग लष्कराच्या ताब्यात आहे. रेडझोनबाधीत क्षेत्रामुळे हा रस्ता अधिक संवेदनशील भागात आहे. पालखी मार्ग विस्ताराच्या सरकाच्या योजनेला त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मावळचे आमदार संजय भेगडे तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याच्या रूंदीकरणाचा तिढा सोडविण्याची मागणी केली.

देहु आणि आळंदी येथून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या पालख्या दर आषाढीला पंढरपूरला जात असतात. दिवसेंदिवस या सोहळ्यांमध्ये सहभागी होणारे भाविक, वारकरी, दिंड्या व त्यांची वाहने यांची गर्दी वाढत चालली आहे. भाविकांना हा सोहळा व प्रवास सुकर व्हावा यासाठी चार वर्षांपुर्वी सरकारने पालखी मार्ग रूंदीकरणाची घोषणा केली होती. काही भागात त्याची अंमलबजावणी झाली असली तरी देहु ते देहुफाटा या सुमारे चार किलोमीटरच्या पहिल्याच टप्प्यातील मार्गाला लष्करी हद्दीची बाधा निर्माण झाली आहे. 

लष्कराकडून जागा मिळणे किंबहुना रस्ता रूंदीकरणाला परवागी मिळवण्यासाठी केंद्रीय पातळीवरून प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी मावळचे आ. संजय भेगडे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सामाजिक कार्यकर्ते लहूमामा शेलार, बाळासाहेब शेलार, अमजनी बत्तल, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, नगर सदस्या शोभाताई भेगडे, संग्राम काकडे, संदिप काकडे, सुधीर अडागळे आदींच्या शिष्टमंडळाने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. पालखी मार्ग रूंदीकरणाच्या या अडचणीची त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी देहूरोड येथे निर्माणाधिन पूलाच्या उद्घाटनासाठी वेळ निश्‍चित करण्याची मागणीही करण्यात आली, अशी माहिती विशाल खंडेलवाल यांनी दिली. गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच पालखीमार्ग रूंदीकरणातील अडसर दूर करण्यात येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.