होमपेज › Pune › आम्ही प्रथमपंथीय का नाही? तृतीयपंथी विचारवंत दिशा शेख 

आम्ही प्रथमपंथीय का नाही? तृतीयपंथी विचारवंत दिशा शेख 

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 12:37AMपिंपरी : प्रतिनिधी

लिंगआधारित भेदभाव तृतीयपंथीयांच्याच वाट्याला येतो. प्रथम पुरुष, द्वितीय स्त्री आणि मग आम्ही तृतीयपंथी येतो. पण आम्ही तृतीयपंथी आहोत हे कोणी ठरविले? आम्ही प्रथमपंथीय का नाही? तृतीयपंथीयच का? आपण जोपर्यंत अशी भाषा सोडणार नाही, तोपर्यंत समतेच्या वाटेवर आपण जाऊ शकणार नाही, असे मत  तृतीयपंथी विचारवंत दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. 

पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधान दिन सोहळा समिती पिंपरी- चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान जनजागरण अभियान राबवण्यात आले होते. त्यावेळी आयोजित आठव्या पुष्पमालेमध्ये ‘व्यक्तिस्वातंत्र्य व संविधान’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. डॉ. अशोक शिलवंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, भारिपचे अध्यक्ष देवेंद्र तायडे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ आदी यावेळी उपस्थित होते. 

दिशा शेख पुढे म्हणाल्या, संस्कृतीने हजारो वर्षापासून आम्हाला माणूस म्हणून दर्जा दिलाच नाही. परंतु संविधानाने व्यक्ती हा शब्द अधोरेखित करून आमचा माणूस म्हणून विचार केला. त्यामुळे एकूणच येथील सगळ्या विषमतेच्या मुळाशी लिंगआधारीत भेदभाव ही मोठी पोकळी आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर 67 वर्षानी शासनाला व्यक्ती या शब्दाचा अर्थ समजला व 2014 साली आम्हाला तृतीयपंथी माणूस म्हणून ओळख देण्यात आली, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव पांडुरंग वाघमारे यांनी केले, विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू मांजरे यांनी आभार मानले.