Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Pune › नक्‍की कोणाची घरे बाधित? नागरिकांत संभ्रम 

नक्‍की कोणाची घरे बाधित? नागरिकांत संभ्रम 

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 22 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या पाच कि.मी.च्या भुयारी मार्गादरम्यान सुमारे 400 कुटुंबे आणि व्यावसायिक  बाधित होत आहेत. या नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) शहरांतील पेठांमधील लोकांसाठी संवादाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या संवादात नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. महामेट्रो आम्हाला, ‘नक्की कोणाची घरे मेट्रो मार्गात जाणार आहेत हे स्पष्ट सांगत नसल्याचा मुख्य आरोप या वेळी नागरिकांकडून करण्यात आला. 

शिवाजीनगर ते स्वारगेट या 5 किमीच्या मेट्रो मार्गात एकूण पाच मेट्रो स्टेशन हे भुयारी मार्गाने बांधण्यात येणार आहे. हा मार्ग बांधताना जी घरे अथवा दुकाने बाधित आहेत त्यापैकी महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट याठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे; मात्र कसबा पेठेतील 245 बाधित घरांचे मालक सर्वेक्षणास तयार नसल्यामुळे याठिकाणच्या मेट्रो स्टेशनच्या जागेचा प्रश्‍न प्रलंबित आहे. आयोजित मेट्रो संवादात या भागातील नागरिकांनी त्यांच्या जागांबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले. या वेळी महामेट्रोचे प्रमुख सल्लागार शशिकांत लिमये, रमेश राव, भुयारी मार्ग प्रकल्प प्रमुख प्रमोद आहुजा, महामेट्रोचे उपसंचालक रामनाथ सुब्रमण्यम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

नागरिकांनी व्यक्त केलेल्या तक्रारी-

जानेवारी 2018 मध्ये कसबापेठेतील कुटुंबांना या भागातील बाधित जागांविषयी सांगण्यात आले. त्याबाबत नागरिकांनी महामेट्रोला पाठविलेल्या एकाही निवेदनाला महामेट्रोकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. महामेट्रोने सर्वेक्षणासाठी नेमलेल्या एजन्सीकडून लोकांना मार्गदर्शन मिळण्याऐवजी दिशाभूल करण्यात आली. लोकांच्या आयुष्याचा प्रश्‍न असल्यामुळे महामेट्रोने किती घरे नक्की बाधित आहेत, याचा आकडा सांगावा त्याशिवाय पुढील चर्चा होणार नसल्याचे नागरिकांकडून 
सांगण्यात आले.

मेट्रो बांधकामाच्या 12 मीटर परिसरातील घरांना नविन बांधकाम किंवा पुनर्विकास करायचा असल्यास महानगरपालिकेसह आता महामेट्रोची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र पहानगरपालिकेकडून मे महिन्याच्या पुर्वी घेण्यात आलेली परवानगी ग्राह्य होणार की नाही याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र महामेट्रोचे उपसंचालक रामनाथ सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले आहे की, इथुन पुढे महमेट्रोकडूनच  नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार आहे. भुयारी मार्गाचे  प्रत्यक्ष टनेलिंगचे काम सुरू होणार असल्यामुळे त्यादरम्यान घरांना धोका आहे की नाही हे समजण्यासाठी महामेट्रोकडूनच परवानगची आवश्यकता असणार आहे.

बाधित कुटुंबाचे प्रश्‍न सोडवणार

कसबा पेठेतील मेट्रो स्टेशनसाठी कोणत्या निश्‍चित जागा जाणार या विषयीची पक्की आरेखने आता झाली असून, नागरिकांशी संवाद साधत बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडविण्यात येणार आहे. संवाद साधत नागरिकांनी येथील सर्वेक्षण पूर्ण करू द्यावे म्हणजे ही प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असे आवाहन महामेट्रोचे उपसंचालक रामनाथ सुब्रमण्यम यांनी केले.