होमपेज › Pune › खासदार आढळराव यांच्याशी मुकाबला कोण करणार?

खासदार आढळराव यांच्याशी मुकाबला कोण करणार?

Published On: Jul 16 2018 1:22AM | Last Updated: Jul 16 2018 12:51AM



पिंपरी ः नंदकुमार सातुर्डेकर 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  पुण्यातील बैठकीत शिवसेना-भाजप युती होणार की नाही याबाबत उत्सुकता कायम ठेवली. मात्र सेनेचे शिरूरचे खासदार  शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मतदारसंघात काम चांगले असल्याचे सांगत त्यांना  ग्रीन सिग्नल दिला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आपण लोकसभा निवडणूक लढवणार की विधानसभा या प्रश्नांवर ‘तुम्ही सांगाल ती’ असे उत्तर देऊन पत्ते ओपन करणे टाळले.  त्यामुळे शिरूरमध्ये खा.  आढळराव यांच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे नक्की रिंगणात कोण असणार याबाबत उत्सुकता आहे. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात आजवर सेनेचा एकच आमदार निवडून येत आहे.  सन 2004 मध्ये बाळासाहेब दांगट (जुन्नर), सन 2009 मध्ये महादेव बाबर (हडपसर) तर 2014 च्या निवडणुकीत सुरेश गोरे (खेड) हे निवडून आले.  मात्र लोकसभा निवडणुकीत सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील  निवडून येत आहेत. सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे आढळराव पाटील 4 लाख 82 हजार 563 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादीचे विलास लांडे यांना 3 लाख 3 हजार 952 मते मिळाली. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती.  या निवडणुकीत आढळराव पाटील यांनी 6 लाख 43 हजार 415 मते घेऊन विजय मिळवला निकम यांना 3 लाख 41 हजार 601 मते मिळाली. 

शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन तर सेना, राष्ट्रवादी, मनसेचा प्रत्येकी एक आमदार आहे. भोसरीतून महेश लांडगे, हडपसरमधून योगेश टिळेकर, शिरूरमधून बाबूराव पाचर्णे हे भाजपचे तीन तर खेडमधून सेनेचे सुरेश गोरे, आंबेगावमधून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, जुन्नरमधून मनसेचे शरद सोनवणे हे निवडून आले आहेत. विधानसभेला भाजपची ताकद वाढल्याने आ. महेश लांडगे लोकसभेची तयारी करीत होते. बैलगाडा शर्यत, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्त्याचे चौपदरीकरण, मोशीतील कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अशा विविध विषयांवरून खा. आढळराव पाटील व आ. लांडगे यांच्यात अनेकदा जुंपली. मात्र हल्ली लांडगे शांत आहेत.  त्यांनी लोकसभेचा नाद सोडून दिल्याची चर्चा आहे.

खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात आढळराव यांचे काम चांगले आहे. त्यामुळे शिरूर जिंकूच, पण शिवसैनिकांनी जिद्द ठेवली तर सहापैकी चार विधानसभा जागांवर भगवा फडकेल असे सांगत शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास जगविण्याचे काम केले.  बैलगाडी शर्यतीबाबत आपण स्वतः केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलू असे सांगत या भागातील जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आस्थाही दाखवली.  या परिस्थितीत खा.  आढळराव पाटील यांच्याशी मुकाबला करू शकेल असा कोणता उमेदवार राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात असावा याबाबत  राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.