Mon, Jun 17, 2019 19:06होमपेज › Pune › गणेशोत्सव कुणी सुरू केला, वाद पुन्हा पेटणार

गणेशोत्सव कुणी सुरू केला, वाद पुन्हा पेटणार

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 26 2018 12:36AMपुणे : प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याचा गणेशोत्सव कुणी आणि केव्हा सुरू केला, हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात भाऊ रंगारी यांनी प्रथमत: 1892 मध्ये केली, असा मजकूर महापालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, तो मजकूर संकेतस्थळावरून हटवण्यात आल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. हा मजकूर सत्ताधार्‍यांच्या दबावामुळे काढण्यात आल्याचा आरोप करत याप्रकरणी महापौर, महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या सायबर सेलच्या प्रमुखास कायदेशीर नोटीस देणार आसल्याची माहिती भाऊ रंगारी गणेश मंडळ ट्रस्टने दिली. 

पुण्याचा गणेशोत्सव भाऊ रंगारी यांनी 1892 मध्ये की लोकमान्य टिळक यांनी 1893 मध्ये सुरू केला, यावरून मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहे. हा वाद न्यायालयातही गेला आहे. भाऊ रंगारी मंडळाने 2016 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला होता. परंतु तो 2017 मध्ये आहे असे सांगत आणि लोकमान्यच त्याचे जनक आहेत असा दावा करत महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी 2017 मध्ये शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला. याअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. या प्रकरणानंतर भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाने उपोषण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कारही भाऊ रंगारी मंडळाने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवला होता. 

केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रोप्यमहोत्सव साजरा करत आहे. या पार्श्‍वभूमीवर  महापालिकेच्या संकेतस्थळावर भाऊ रंगारी यांनीच 1892 मध्ये सार्वजनिकरित्या गणेशोत्सव सुरू केला असे नमूद करण्यात आले होते. याबद्दल भाऊ रंगारी मंडळाच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत महापौर व महापालिकेचे आभार मानण्यात आले होते. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास महापालिकेच्या सायबर सेलने संकेतस्थळावरील भाऊ रंगारी यांनी 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, हे वाक्य काढून इतर मजकूर ठेवला आहे. त्यामुळे मागील वादावरील खपली निघून पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.  

मजकूर दुरुस्त करण्यात आला

या मजकुराविषयी मला माहित नव्हते. ही बाब आयुक्तांच्या कानावर घातली. त्यानंतर तांत्रिक विभागप्रमुख राहुल जगताप यांना विचारणा करण्यात आली. हा मजकूर पूर्वी कधीतरी टाकण्यात आला आहे. पुरातत्त्व विभाकडून जो मजकूर आला होता, त्यावेळी तो टाकण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, आता तो मजकूर दुरुस्त करण्यात आला आहे.

- मुक्ता टिळक, महापौर

कायदेशीर नोटीस देणार 

पुण्याचा गणेशोत्सव भाऊ रंगारी यांनी सुरू केल्याचे पुरावे नाकारले जात आहेत. महापालिका प्रशासनाने सत्यता स्वीकारून संकेतस्थळावर भाऊ रंगारी यांनीच 1892 मध्ये सार्वजनिकरित्या गणेशोत्सव सुरू केला असे नमूद केले होते. त्याबद्दल आम्ही महापौर व महापालिकेचे आभार मानले होते. मात्र, सत्ताधर्‍यांच्या दबावामुळे महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा मजकूर डिलीट केला आहे. त्यामुळे आम्ही महापौर, पालिका आयुक्त आणि सायबर सेलचे तांत्रिक विभागप्रमुख राहुल जगताप यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत.

- सुरज रेणुसे, विश्‍वस्त, भाऊ रंगारी गणेश मंडळ