Tue, Jul 16, 2019 22:18होमपेज › Pune › भुजबळांना कारवाईआधी पूर्वसूचना देणारा कोण?

भुजबळांना कारवाईआधी पूर्वसूचना देणारा कोण?

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

पोलिसांची घरी अथवा मालमत्तेवर धाड पडण्यापूर्वी आपणास तिकडे बसलेला व्यक्ती हळूच माहिती देत होता, असे वक्तव्य माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ केले होते. त्यांना कारवाई पूर्वीच नेमकी पूर्वसूचना देणारा व्यक्ती कोण? याचा शोध घ्यावा तसेच भुजबळ यांच्याकडे यादृष्टीने सखोल तपास करावा, अशी मागणी चंद्रकांत सुतार (रा.पिंपळेगुरव, पुणे) यांनी पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचेकडे अर्जाद्वारे केल्याची माहिती सुतार यांचे वकील अतुल पाटील यांनी दिली आहे. 

सुतार यांचे वकील अ‍ॅड.पाटील म्हणाले, धाड पडण्यापूर्वीच छगन भुजबळ यांना पूर्वसूचना देणारा ‘तो’ कर्मचारी किंवा अधिकारी कोण होता?, त्याने अशी पूर्वसूचना भुजबळ यांना किती वेळा दिली, अशी पूर्वसूचना देण्यासाठी त्याला काय फायदा होता, याप्रकारचे काम तो आणखी कोणा कोणासाठी करत होता व आहे, अशा पुर्वसूचनामुळे संशयित आरोपी सावध झाल्याने तपास यंत्रणेचे किती नुकसान झाले आहे? या सर्व बाबींचा गांभीर्याने तपास करणे आवश्यक आहे. 

भुजबळ यांनी संबंधित व्यक्तीचे नाव सांगणे गरजेचे असून त्याबाबत त्यांचेकडे सखोल तपास करणे आवश्यक आहे. अन्यथा ताकदवान व्यक्ती तपास यंत्रणा सोबत तडजोड करू शकतो असा संदेश समाजात जाईल, असेही  तक्रार अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे.