Thu, May 23, 2019 14:43
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘गड्या आपला गावच बरा होता’

‘गड्या आपला गावच बरा होता’

Published On: Jun 11 2018 1:07AM | Last Updated: Jun 11 2018 12:33AM मुंढवा : नितीन वाबळे

महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमार्फत गावचा कारभार होत होता. त्यांच्याकडे तक्रार करून नागरिकांना दाद मागता येत होती. मात्र, पालिकेत गेल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी नाही आणि पालिकेचे अधिकारी कोण आहेत, त्यांच्यापर्यंत कसे जायचे हे सामान्यांना माहिती नाही. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने घेतलेला आढावा..

शहराच्या हद्दीलगत असलेल्या अकरा गावांचा मागील आठ महिन्यांपूर्वी पालिकेत समावेश झाला. महापालिकेत समावेश करावा म्हणून केशवनगर आणि साडेसतरानळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर तीन महिने प्रशासकामार्फत कारभार चालविला गेला. मनपामध्ये समावेश झाल्यावर किमान मूलभूत सुविधा मिळतील, अशी सामान्य नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, आठ महिन्यांनंतरही आवश्यक सुविधा मिळत नसल्याने आमची ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या अगोदर 1997 साली केशवनगर व साडेसतरानळी ही दोन्ही गावे पालिकेत समाविष्ट केली होती. त्यांनतर 2002 पर्यंत पाच वर्षे ही गावे पालिकेत होती. मात्र, आवश्यक त्या नागरी सुविधा मिळत नसल्याने या गावांनी पुन्हा ग्रामपंचायत हवी अशी मागणी केली. 

येथे पुन्हा ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यावर आतापर्यंत या दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी चार पंचवार्षिक निडवणुका झाल्या. या दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडून विकास योजणा राबविल्या गेल्या. मात्र, वाढत्या नागरिकरणामुळे विकास निधी अपुरा पडू लागला. नागरिकांना सुविधा मिळण्यामध्ये अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे ग्रामपंचायत पुन्हा पालिकेत समाविष्ट करावी अशी मागणी जोर धरू लागली.  

जुलै 2017 मध्ये या दोन्ही ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कालावधी संपला. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूका जाहीर केल्या. मात्र, मतदान झाले, तर पुढील पाच वर्षे महापालिकेत समावेश होणार नाही. अशी नागरिकांची भावना निर्माण झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीने उमेदवारी अर्ज भरण्यावरच थेट बहिष्कार टाकला. त्यामुळे या गावांत निवडणुका झाल्या नाहीत. त्यानंतर तीन महिन्यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत महापालिका प्रशासनामार्फत या दोन्ही गावातील कारभार सुरू आहे. केशवनगर आणि साडेसतरानळी या दोन्ही गावांची लोकसंख्या सुमारे एक लाखाच्या घरात आहे. दोन्ही गावे शहरालगत असल्याने कामगारवर्ग या परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवासी झाला आहे. मात्र, पालिकेत समावेश होऊनही नागरी सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे.