Wed, Mar 20, 2019 22:54



होमपेज › Pune › पिंपरीच्या आयुक्‍तपदी कोण? याचीच चर्चा!

पिंपरीच्या आयुक्‍तपदी कोण? याचीच चर्चा!

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:46AM



पिंपरी : प्रतिनिधी

गेली अनेक वर्षांपासून नुसतीच चर्चा, प्रस्ताव, फेरप्रस्ताव, बैठका, आश्‍वासने सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी येणारा खर्च, सध्या तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर घ्यावा लागणार्‍या इमारती, कार्यालय, फर्निचर खर्च, पोलिस वसाहत आदीसाठी येणार्‍या खर्चालाही मंजुरी दिलेली आहे. यामुळे आता नव्याने होणार्‍या या आयुक्तालयाचे पाहिले पोलिस आयुक्त म्हणून कोणाची वर्णी लागतेय याची चर्चा सुरु आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात आणि बाजूच्या ग्रामीण परिसरात भरदिवसा खून, हातात नंग्या तलवारी, कोयते घेऊन सपासप वार करून समोरच्याला संपवून परिसरात दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करणे, किरकोळ कारणावरून राडा, शाळा-महाविद्यालयांतील वादविवाद, मुलींच्या वादातून एकमेकांचे मुडदे पाडणे, धारदार हत्याराने वार करून आयुष्यभरासाठी अपंगत्व आणणे, महिलांची छेडछाड, महिलांवरील अत्याचार, आयटी अभियंता तरुण-तरुणींचे खून, लुटमार, टोळी युद्ध, गोळीबार, जागेचा ताबा घेणे, त्यासाठी दोन टोळ्यांमधील राडा, दरोडा, वाहनचालकांना लुटणे, महिलांच्या, पुरुषांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे, फसवणूक, एकाच जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून जागा लाटण्याचे प्रयत्न करणे, अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळ्या, फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे पिंपरी-चिंचवड शहरात घडत आहेत. शहरासाठी सध्या असणार्‍या पोलिसांची संख्या गुन्हेगारी आणि गुन्ह्यांचा अकडा पाहता फारच कमी आहेत. यातच वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष असल्याने शहरातील गुन्हेगारी फोफावत होती.

शहरामध्ये बॉम्बस्फोटातील सराईत गुन्हेगार, दहशतवादी, नक्षलवादी यांचे वास्तव झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड हे गुन्हेगारांचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे. शहराला लागून असणारे दिघी, आळंदी, तळेगाव, देहूरोड आणि चाकण याही परिसरात मोठी गुन्हेगारी वाढलेली आहे. चाकण आणि तळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत वाढलेली आहे. मल्टिनॅशनल कंपन्याने आपले कारखाने सुरू केले आहेत. आयटी पार्कही ग्रामीणच्या हद्दीत आहेत. यामुळे या परिसरात टोळी युद्ध सुरु झाले. जमिनीचे भाव वाढल्याने खून, खुनाचे प्रयत्न, धमकावणे, ताबा मारणे असे गुन्हे घडत आहेत. याठिकाणीही पोलिसांची संख्या कमी आहे. हद्द प्रचंड मोठी आणि पोलिस यंत्रणा कमी पडत असल्याने गुन्हेगारी वाढत आहे. याबाबत गेली तीन वर्षापासून दै. पुढारीमध्ये सविस्तर वृत्तांकन केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची आणि ग्रामीणची वाढती गुन्हेगारी पाहता स्वंतत्र पोलिस आयुक्तालयाची गरज निर्माण झाल्याचेही वृत्त प्रसिद्ध केले. पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा दाखला लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात देऊन त्यांनीही स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी केली. यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. मंगळवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळात यास मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच दै. पुढारीत स्वतंत्र पोलिस आयुक्तालय एक मे रोेजी सुरु होण्याची शक्यता वर्तवली होती. मंगळवारी झालेल्या मंजुरीमुळे ती खरी होण्याची शक्यता आहे. 

चार हजार आठशे चाळीस पोलिस

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयास चार हजार आठशे 40 पोलिसांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिस दलाकडून 2207 पदे मिळणार आहे. तर 2633 पोलिसांची अतिरिक्त गरज नव्या आयुक्तालयासाठी आवश्यक असून, तीन टप्प्यात भरती केली जाणार आहे. 

आयुक्‍तालयासाठी आवश्यक अधिकारी

पोलिस आयुक्त 1 अप्पर पोलिस आयुक्त 1 पोलिस उपायुक्त 3 सहाय्यक पोलिस आयुक्त 13 यापैकी एक उपायुक्त व दोन सहाय्यक आयुक्त सध्या उपलब्ध आहेत. तर आयुक्तांसह अन्य 11 अधिकार्‍यांची नियुक्ती करावी लागणार आहे. ही नियुक्ती लवकर होण्याची शक्यता  सूत्रांनी दिली.

 

Tags : pimpri, pimpri news, Commissioner, Discussion,