Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Pune › मावळात भाजपची उमेदवारी कोणाला?        

मावळात भाजपची उमेदवारी कोणाला?        

Published On: Jan 26 2018 1:23AM | Last Updated: Jan 25 2018 10:23PMपिंपरी ः नंदकुमार सातुर्डेकर

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने केल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात चांगलीच रंगत येणार आहे. शिवसेनेकडे तूर्तास तरी खासदार श्रीरंग बारणे हाच चेहरा आहे; मात्र भाजपची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर यापैकी कोणाला मिळणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.   

सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत तिकिटासाठी मोठे रणकंदन झाले. शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांनी शिवबंधन तोडले व राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत शेकापतर्फे रिंगणात उतरलेल्या आ. लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली. 

या निवडणुकीत बारणे हे 5 लाख 12 हजार 226 मते मिळवून विजयी झाले, तर जगताप यांना 3 लाख 54 हजार 829, तर राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांना 1 लाख 83 हजार 293 मते मिळाली. पुढे आमदार जगताप यांनी काळाची गरज ओळखून विधानसभेला भाजपचा झेंडा हाती घेतला आणि चिंचवड मतदारसंघातून विजयही मिळवला. 

पुढे त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेेते आझम पानसरे, शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचाही भाजपात प्रवेश झाल्याने मावळात भाजपची ताकद वाढली आहे. 
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत ठाकूर, मावळात बाळा भेगडे, चिंचवडला लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार निवडून आले आहेत, तर कर्जतला राष्ट्रवादीचे सुरेश लाड, उरण व पिंपरीत सेनेचे अनुक्रमे मनोहर भोईर व गौतम चाबुकस्वार निवडून आले आहेत. 

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड महापालिका, पनवेल, लोणावळा, तळेगाव नगरपरिषद अशी महत्त्वाची सत्तास्थाने भाजपाच्या हातात आहेत. या मतदारसंघातील सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे काम चांगले आहे. सलग तीनदा त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे; मात्र या मतदारसंघात भाजपची वाढलेली ताकद ही खा. बारणे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. 

लोकसभेला युती होईलच असे गृहीत धरून खा. बारणे यांनी शिवसेनेबरोबरच भाजपच्या नेत्यांशीही चांगले संबंध प्रस्थापित केले होते. त्यांनी मागे लालकृष्ण अडवानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेेट घेेतल्याने ते भाजपात जाणार, अशी चर्चा झाली; मात्र डांगे चौक वाहतूक समस्येच्या पाहणीदरम्यान पत्रकारांशी बोलताना खा. बारणे यांनी आपल्या भाजप प्रवेशाची चर्चा हा फालतूपणा आणि भाजपचे षड्यंत्र असल्याचे सांगितल्याने मावळचे चित्र काहीसे स्पष्ट झाले. त्यातच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपतर्फे रिंगणात कोण असेल, याबाबत चर्चेस उधाण आले आहे. सध्या तरी आमदार लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे व प्रशांत ठाकूर यांची नावे जोरदार चर्चेत आहेत.