Thu, Sep 20, 2018 12:14



होमपेज › Pune › ’अन्नसुरक्षा’चे 99 लाख लाभार्थी कोण?

’अन्नसुरक्षा’चे 99 लाख लाभार्थी कोण?

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 10:55PM



पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत नवीन 99 लाख शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य मिळणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वी केली; परंतु त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील किती शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार आहे, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे अन्नसुरक्षा योजनेचेे नवीन लाभार्थी कोण असणार आहेत याविषयी संभ्रम निर्माण 
झाला आहे.

अन्नसुरक्षाचा नवीन 99 लाख शिधापत्रिकांना लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये 44 हजारांपेक्षा पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 56 लाख 63 हजार 282 आणि 59 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या 36 लाख 73 हजार 32 आणि अंत्योदय अन्न योजनेतील 1 व 2 सदस्य असलेले शिधापत्रिकाधारक असणार आहेत. परंतु हे लाभार्थी कोण असणार आहेत, याची कसलीच माहिती पुरवठा विभागाकडे नाही. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर नवीन लाभार्थी शोधण्याचे काम सुरु करण्यात आले असून, आतापर्यंत केवळ 450 लाभार्थ्यांचा शोध लागला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड  पालिका हद्दीतील 11 क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातून 6 लाख 71 हजार 39 शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेतून तर अंत्योदयच्या 9 हजार 616 कुटुंबांना 889 धान्य दुकांनातून धान्यवाटप केले जाते.

जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये अंत्योदय आणि अन्न सुरक्षाच्या एकूण 5 लाख 31 हजार 91 शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जाते. परंतु बापट यांनी केलेल्या घोषणेमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील नवे लाभार्थी किती असणार आहेत. या नवीन 99 लाख लाभार्थीचा शोध घेऊन त्यांना प्रत्यक्षात लाभ कधीपर्यंत मिळेल, याची कोणतीच माहिती पुरवठा विभागाकडे उपलब्ध नाही.