Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Pune › शिवसेना जिल्हाप्रमुखपदी कोण?

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी कोण?

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:30AM

बुकमार्क करा
पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिफारशीने योगेश बाबर यांची नियुक्ती झाल्याने, आता जिल्हाप्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत सेनेच्या वर्तुळात उत्सुकता आहे. खा. बारणे यांनी त्यांच्याशी फारसे जमत नसलेल्या जिल्हाप्रमुख मच्िंछद्र खराडे यांचा पत्ता कट करण्यासाठी व आपले समर्थक गजानन चिंचवडे यांची त्या पदावर वर्णी लावण्यासाठी डावपेच खेळले खरे; पण आता सत्तेचा समतोल राखण्यासाठी खराडे यांनाच कायम ठेवले जाईल, किंवा बाबर यांच्या नियुक्तीने अस्वस्थ असलेल्या एखाद्या चेहर्‍यास संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलेले लक्ष, राष्ट्रवादीतील दिग्गजांचा  भाजपा प्रवेश, सेनेतील गटातटाचे राजकारण, चुकीचे तिकीट वाटप यामुळे शिवसेनेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. 128 पैकी 77 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता संपादन केली, तर सेनेला अवघ्या 9 जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीनंतर शहरप्रमुख राहुल कलाटे गटनेते झाले.  

विधानसभेला इच्छुक असल्याने त्यांनी आपल्याला शहरप्रमुखपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली. त्यातच राज्यात सेनेचे भाजपाशी संबंध ताणले गेल्याने सेनेची लोकसभा, विधानसभा निवडणुकीस स्वतंत्ररीत्या सामोरे जाण्याची तयारी सुरू आहे. पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडे संपर्कनेतेपदाची जबाबदारी दिल्याने सेनेत संघटनात्मक बदलाचे संकेत मिळाले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेऊन मते आजमाविली होती.  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शहरप्रमुखपदासाठी सुलभा उबाळे यांच्या, तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी योगेश बाबर यांच्या नावाचा आग्रह धरला; मात्र बाबर यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांनी पसंती दिली व त्यांची नियुक्ती झाली. 

योगेश बाबर हे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे पुतणे आहेत. लोकसभेला मावळातून तिकीट नाकारले गेल्याने गजानन बाबर यांनी शिवबंधन तोडले व शेकापच्या लक्ष्मण जगताप यांची पाठराखण केली होती; मात्र योगेश बाबर शिवसेनेतच राहिले. महापालिका निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने बाबर यांनी मोरवाडी-शाहूनगरमधून बंडखोरी केली व लक्षणीय मतेही मिळवली होती. दरम्यान, ते भाजपाच्याही संपर्कात होते; मात्र खासदार बारणे यांनी शहरप्रमुखपदासाठी शब्द दिल्याने ते सेनेतच राहिले.

बाबर यांच्या नियुक्तीची घोषणा होताच सेनेतील वाद उफाळला आहे. बाबर यांच्या नियुक्तीचा फेरविचार न केल्यास पक्ष सोडण्याचा इशारा एका गटाने दिला.  बाबर यांना विरोध करण्यामागे दबावतंत्रही आहे. शहरप्रमुखपद खा. बारणे यांच्या शिफारशीने दिल्याने  आता खा. बारणे विरोधकांनी जिल्हाप्रमुखपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे, त्यामुळे खा. बारणे यांनी शिफारस केलेल्या गजानन चिंचवडे यांच्या नावाला कात्री लागण्याची शक्यता आहे. शहरप्रमुख नियुक्तीनंतर आता शहर कार्यकारिणीत आपापल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी गटातटाचे प्रयत्न सुरू आहेत.