Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Pune › पदपथ गेले कुणीकडे..?

पदपथ गेले कुणीकडे..?

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 01 2018 10:26PMपिंपरी : प्रतिनिधी

एकीकडे स्मार्ट सिटीच्या यादीत नव्याने समावेश झालेल्या औद्योगिक नगरीत विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र महापालिकेच्याच दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना पदपथांच्या दुरवस्थेमुळे रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. शहरातील जवळपास सर्वच भागातील पदपथांची या ना त्या कारणाने दुरवस्था झाली असून काही ठिकाणी पदपथ होते की नाही असा प्रश्न पडत आहे. 

सद्यःस्थितीत एकीकडे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणे घेउन उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येत आहे.  तर दुसर्‍या बाजूला सामान्य नागरिकांना चालण्यासाठी बनवण्यात आलेले पदपथ उद्ध्वस्त झाले आहेत. जे उरले आहेत त्यांच्यावरून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे चालणे मुश्कील झाले आहे. महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पदपथांची मोडतोड झाली आहे. उखडलेल्या फरश्या  तसेच पदपथावर पडलेले जीवघेणे खड्डे अशा पदपथावरून ज्येष्ठ नागरिकांनी चालायचे कसे असा प्रश्न पादचारी विचारत आहेत. आकुर्डी चौक,  चिंचवड स्टेशन, लिंक रोड, काळभोर नगर, मोरवाडीचौक, संभाजीनगर  परीसरातील पदपथ नष्ट झाले असून यावर आता सर्रास वाहनांची वर्दळ सुरु झाली आहे. त्यामुळे पादचार्‍याना रस्त्याच्या कडेनेही जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही दुर्लक्षच होत आहे. त्यामुळे पदपथांची दुरुस्ती होणार का असा सवाल नागरीक करत आहेत.