Thu, Jun 27, 2019 09:38होमपेज › Pune › जिथे माणुसकीच संवेदनाशून्य होते...

जिथे माणुसकीच संवेदनाशून्य होते...

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी

पुण्यातील माणसुकी कशी संपुष्टात येत चालली आहे, याचा अनुभव खुद्द महापालिका आयुक्त सौरभ राव यांना नुकताच आला. स्वत:च्या अपघातग्रस्त मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी राव तब्बल दहा ते बारा मिनिटे रस्त्यांवरून जाणार्‍या वाहनांना थांबण्यासाठी विनवणी करत होते; मात्र एकही वाहन थांबायला तयार नव्हते. अखेर एक प्रवासीवाहतुक करणारा चालक त्यांच्या मदतीला धावला आणि अपघातग्रस्त मुलाला घेऊन ते रुग्णालयात पोहचले.

संकटच्या काळात पुणेकर नेहमीच मदतीला धावतात; असे कायम अभिमानाने सांगण्यात येते;  मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र बदलत असल्याचे दुर्दैवी वास्तव आहे. असाच धक्कादायक अनुभव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रविवारी सकाळी घेतला. राव हे त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा अंजनेय आणि मुलगी वासवी यांच्या समवेत सायकलींग करण्यासाठी पाषाण भागात गेले होते. तिघेही वेगवेगळ्या सायकलींरून जात असताना, ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या परिसरात एका दुचाकीस्वराने अंजेनियाच्या सायकलला धडक दिली. यात अजेंनिया रस्त्यांवर कोसळला, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून रक्त वाहू लागले.  राव यांच्या डोळ्यासमोरच हा अपघात झाल्याने नक्की काय करावे हे त्यांना सुचनेसे झाले. बरोबर असलेली त्यांची मुलगीही गांगरून गेली होती. अशाच परिस्थितीत राव यांनी अंगावरील टी शर्ट काढुन मुलाच्या डोक्याला बांधला आणि त्याला रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रस्त्यांवरून जाणार्‍या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करू लागले; मात्र तब्बल पंधरा ते वीस वाहनांना हात केल्यानंतरही कोणी थांबले नाही. काहींनी तर थांबून प्रत्यक्ष परिस्थितीही पाहिली; मात्र जखमी अवस्थेत असलेल्या मुलाला गाडीत न घेता ते तसेच पुढे निघून गेले. 

अखेर  प्रवासी वाहतुक करणार्‍या एका वाहनाचा चालकाच्या मदतीने त्यांनी खासगी रुग्णालय गाठले. डोक्याची जखम खोल असल्याने प्राथमिक उपचारानंतर अंजनेयला तातडीने पुणे स्टेशन परिसरातील दुसर्‍या रुग्णालयात  हलविण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून अंजेनियाची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेने पुणेकरांमध्ये आता माणसुकी शिल्लक राहिलीच नाही का, असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

आपलं पुणं खरच असं आहे का ?

मुलाच्या अपघाताच्या घटनेनंतर सौरभ राव यांनी, ‘आपलं पुणं खरच असं आहे का’ असा उद्विग्न सवाल उपस्थित केला. ‘आम्ही रस्ता सुरक्षा सप्ताह राबवितो, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी उपाययोजना करतो. मात्र,आपल्याला आणखी खूप काम करावे लागणार असल्याचे या घटनेने शिकविल्याचे ते म्हणाले.