Thu, Aug 22, 2019 11:21होमपेज › Pune › गणेशमूर्तींचा विश्‍वविक्रमाचा प्रस्ताव गेला कुठे?

गणेशमूर्तींचा विश्‍वविक्रमाचा प्रस्ताव गेला कुठे?

Published On: Jul 29 2018 1:46AM | Last Updated: Jul 29 2018 1:24AMपुणे : हिरा सरवदे

गणेशोत्सवानिमित्त महापालिकेच्या वतीने गतवर्षी  विश्‍वविक्रमी गणेशमूर्ती तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात येणार असल्याचा मोठा गाजावाजाही पालिकेकडून करण्यात आला होता. या नोंदणीसाठी गिनीज बुककडे 2 लाख रुपयांचे शुल्कही जमा केले होते. मात्र यासंबंधीचा प्रस्ताव अद्याप गिनीज बुककडे पाठवलाच गेला नसल्याची माहिती विश्‍वासनीय सूत्राकडून मिळाली आहे. यासंबंधी पालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख एकमेकांकडे बोट दाखवत टोलवा टोलवी करत असून या विषयावर बोलणेही टाळत आहेत. दुसरीकडे प्रस्ताव पाठविण्याचे काम ज्यांना दिले आहे, तेही फोन घेत नसल्याने हा प्रस्ताव नेमका गेला कुठे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

पुण्याचा गणेशोत्सव जगभरात पोहचविण्यासाठी गतवर्षी महापालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांसाठी महापालिकेने दोन कोटी रुपयाची तरतूदही केली होती. याअंतर्गत एकाच वेळी तीन हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्त्या तयार करणे आणि एकाच वेळी दोन हजार ढोलांचे वादन करण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्यक्षात मात्र पर्यावरण पूरक गणेशमूर्त्या तयार करण्याचाच उपक्रम घेण्यात आला. दोन हजार ढोलांचे वादन करण्याचा उपक्रम न होण्यास पोलिस परवानगी, गणेशोत्सवात ढोल पथकांचा व्यस्तपणा, आणि व्यवस्थापनातील ‘त्रुटी’ अशी अनेक कारणे होती. 

सारसबागेजवळील सणस मैदानात दि. 24 ऑगस्ट 2017 ला झालेल्या या उपक्रमात  3 हजार 82 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यासाठी महापालिकेने 20 ते 25 लाख रूपये खर्चही केले आहेत. उपक्रमाची माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे पाठविण्यासाठी महापालिकेने गिनीजने घालून दिलेल्या नियमांनुसार या उपक्रमाचे चित्रीकरण केले होते. यासाठी निरिक्षकांचीही नेमणूक केली होती. सर्व माहिती गिनीज बुककडे पाठवल्यानंतर या माहितीच्या आधारे विश्वविक्रम झाला आहे किंवा नाही, हे कळविले जाणार होते. उपक्रम झाल्यानंतर दोन दिवसात माहिती गिनीज बुककडे पाठविली जाणार असल्याचे पालिकेतील पदाधिकार्‍यांंनी छातीठोकपणे सांगितले होते. मात्र, हा उपक्रम राबवून 11 महिने उलटून गेले. तरीही विश्वविक्रमाच्या नोंदणीचा प्रस्ताव गिनीज बुककडे पाठविला गेला नसल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे. त्यामुळे नोंदणीसाठी महापालिकेने गिनीज बुककडे शुल्क रुपात जमा केलेले 2 लाख बुडाल्याचेही सांगण्यात येत आहे. 

हा उपक्रम राबविण्याची जबाबदारी पालिकेच्या विविध विभागांना विभागून दिली होती. त्यामुळे या उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली किंवा नाही, हे कोणत्याही विभागाचा अधिकारी सांगत नाही. सर्व अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत टोलवा टोलव करत आहेत. हे अधिकारी एकदा फोन घेतल्यानंतर पुन्हा फोनसुद्ध घेत नाहीत. याशिवाय या उपक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यासाठी पालिकेकडून नियुक्ती करण्यात आलेले मिलिंद वेर्लेकर यांना तीन चार वेळा दूरध्वानी वरून संपर्क साधूनही ते त्याला प्रतिसाद देत नाही. तसेच महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे गणेशमुर्त्या साकारण्याच्या विश्‍वविक्रमाचा प्रस्ताव नेमका गेला कुठे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.