Sat, Jun 06, 2020 10:33होमपेज › Pune › पुणेकरांना खड्ड्यात घालणार्‍यांवर कारवाई कधी

पुणेकरांना खड्ड्यात घालणार्‍यांवर कारवाई कधी

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:31AMपुणे : पांडुरंग सांडभोर

‘नेमेची येतो पावसाळा’ ही उक्ती सर्वपरिचित आहे. मात्र, या पावसाळ्याबरोबर आता खड्डेही येतात. असे चित्र गेल्या काही वर्षांपासून पहायला मिळत आहे. अवघ्या महिनाभरापुर्वी महापालिकेने डागडुजीपोटी ज्या रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले, त्यावर अवघ्या आठवडाभराच्या पावसाने खड्डे पडले. अशा रस्त्यांच्या कामांचा दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, तरीही संबधित ठेकेदारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भुमिकेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 

गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सुदैवाने अद्यापही काही मुख्य रस्ते त्यास अपवाद म्हणावे लागतील. मात्र, हे चार दहा रस्ते सोडले तर शहरात खड्डे विरहीत रस्ता शोधून सापडणार नाही अशी अवस्था आहे, उपनगरातील रस्त्यांची अवस्था तरी गंभीरच म्हणावी लागेल. केवळ खड्डेच नाही तर अनेक ठिकाणी पाण्याची मोठी डबकी, रस्त्यांवर पसरलेली खडी असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या संख्येतही भर पडली आहे. त्यावरून महापालिकेच्या मुख्यसभेत प्रशासनावर टीका झाली, सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोपांची चिखलफेक केली. मात्र, दरवर्षीच उभे राहणारे हे खड्ड्यांचे संकट रोखण्यासाठी काय उपाय योजना करता येईल का यावर मात्र काही ठोस चर्चा झाली नाही, केवळ काही माननीयांनी परदेशातील रस्त्यांवर खड्डे पडत नाही. मग आपल्याच रस्त्यांवर दरवर्षी खड्डे का पडतात असा प्रश्‍न उपस्थित केला. या प्रश्‍नातही तितकेच तथ्य आहे. महापालिका पावसाळ्यापुर्वी रस्त्यांच्या डागडुजींवर कोट्यांवधीचा खर्च करते. मात्र, तरीही परिस्थितीत सुधारणा नाही. त्यामुळे आता गांभीर्याने याबाबत विचार करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

खड्डे पडण्याची अनेक कारणे आहेत, त्यात प्रामुख्याने निकृष्ट पध्दतीने होणारी कामे हे प्रमुख कारण आहे, रस्ते करताना आवश्यक असलेले निकष पाळले जात नाहीत, त्यामुळे हे रस्ते खड्डे पडतात. मात्र, त्यावरून गेल्या काही वर्षात संबधित ठेकेदारांवर प्रशासनाने कारवाई केल्याचे दिसून येत नाही. तसेच या प्रकरणी संबधित विभागाच्या अभियंत्यांची जबाबदारी तितकीच महत्वाची असते. मात्र, या दोन्हीही नामोनिराळे राहतात. त्यामुळे पहिले पाढे पंच्चावन्न असा सगळा कारभार वर्षानुवर्षे सुरू आहे. सद्यस्थितीला महापालिकेच्या 90 टक्के कामांमध्ये ठेकेदारांकडून रिंग करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यात माननीय आणि पालिकेचे अधिकारीही आघाडीवर आहेत. त्यासंबधीचे पुरावेही समोर आले होते. मात्र, हे प्रकार अद्यापही थांबायला तयार नाहीत. त्यामुळे जर रस्ते आणि विकासकामांमध्ये जर ‘रिंग’ होणारा असेल तर त्याची गुणवत्ता कशी राहणार हाच महत्वाचा प्रश्‍न आहे. त्यामुळेच रस्त्यांची अशी अवस्था झाली. त्यासाठी खड्डे पडू नयेत यासाठी परदेशातील तंत्रज्ञान आणण्याची गरज नाही, तर त्याची गुणवत्ता राखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे. जर महिनाभरापुर्वी पालिकेने जवळपास 30 कोटी रुपये खर्चून रस्त्यांची कामे केली तर त्यावर केवळ आठवडाभराच्या पावसाने खड्डे पडलेच कसे याचे उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे. मात्र, वरिष्ठ अधिकारी अशा ठेकेदारांना पाठिशी घालण्याचे काम करीत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. हे रोखण्यासाठी ठेकेदार आणि संबधित अधिकारी यांची जबाबदारी लक्षात घेऊन कारवाई करण्याची गरज आहे तरच भविष्यात हे चित्र बदलू शकते.

रस्त्यांच्या दुर्दशेस कारणीभूत ठरत असलेला आणखी एक घटक म्हणजे रस्ते खोदाई. शहरात सद्यस्थितीला महावितरण, एमएनजीएल आणि विविध मोबाईल कंपन्यांकडून खोदाईची कामे सुरू आहेत. तर सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिकेने एचडीडी या खोदाईमुक्त तंत्रज्ञानाचा वापर करणे बंधनकारक केले होते. मात्र, ते खर्चिक असल्याने एकाही कंपनीकडून त्याचे पालन झालेले नाही. त्यामुळे चांगले रस्ते खोदले जातात. धक्कादायक म्हणजे कंपन्यांनी त्यांच्या केबल अथवा वाहिन्या टाकल्यानंतर त्यावर पुर्नडांबरीकरण महापालिकेकडून केले जाते. मात्र, ही कामे अतिशय निकृष्ट पध्दतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी सिमेंटने हे रस्ते बुजविले गेले आहेत, मात्र, सिमेंट खचल्याने आणि उखडल्याने रस्त्यांच्या दुर्देशेत भर पडली आहे. त्यामुळे अशा कामांबाबतही गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे. तरच रस्त्यांची बिकट अवस्था थांबेल. त्यासाठी नागरिकांनाही पुढे येण्याची गरज आहे. तरच भविष्यात हे चित्र बदलू शकेल.