Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Pune › खलनायक साकारताना अभिनयाचा लागतो कस

खलनायक साकारताना अभिनयाचा लागतो कस

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:09AMपुणे : प्रतिनिधी

पुणे हे माझे घर असून पुण्याशी माझे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. ‘रणांगण’ चित्रपटात देखील मी पुण्याचाच मुलगा आहे. चित्रपटात माझी खलनायकाची भूमिका आहे. नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. आपण वास्तवात चित्रपटातील खलनायकाप्रमाणे क्रूर नसतो त्यामुळे खलनायकाच्या भूमिकेसाठी जास्तच मेहनत घ्यावी लागते. असे मत प्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.

दै. ‘पुढारी’ आयोजित ‘माधवबाग’ प्रस्तुत कार्यक्रमात राकेश सारंग दिग्दर्शित ‘रणांगण’ चित्रपटाच्या टीमशी गप्पा आणि ‘एक दुजे के लिये’ या हिंदी सांगीतिक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, दिग्दर्शक राकेश सारंग, अभिनेत्री प्रणाली घोगरे, निर्मात्या करिष्मा जैन, सहनिर्माते कार्तिक निशानदार, दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या अध्यक्षा स्मितादेवी जाधव उपस्थित होत्या. ‘रणांगण’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने केतन पळसकर यांनी चित्रपटाच्या ‘टीम’शी संवाद साधला. या कार्यक्रमाला भरत मित्र मंडळ, महाशिवरात्री उत्सव समिती ट्रस्ट, निरंजन दाभेकर, मयूर कडू, श्रावणबाळ फाउंडेशन, शिवा फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार, गंधार एंटरटेन्मेंट आदींचे सहकार्य लाभले.

माधवबागतर्फे विनाशस्त्रक्रिया 

आयुर्वेदिक पद्धतीने हृदयविकार, मधुमेह, अतिरक्तदाब अशा आजारांचे निवारण केले जाते. माधवबागचे राज्यात 140 दवाखाने, दोन निवासी दवाखाने तसेच मध्य प्रदेशात 12 दवाखाने आहेत. भरत मित्र मंडळ हे गेल्या चाळीस वर्षांपासून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. शिवा फाउंडेशन, श्रावणबाळ फाउंडेशनतर्फे अनाथ मुले, वृद्ध, अपंगांच्या सबलीकरणासाठी काम केले जाते. 
कार्यक्रमात सुरूवातीला 4 हजार कार्यक्रम यशस्वीपणे केलेल्या गायिका मनीषा निश्‍चल यांनी प्रसिध्द हिंदी गीते सादर केली. मनीषा यांच्या गायनाने आणि सोबत असलेल्या वाद्यवृंदाने रसिकांची मने जिंकून घेतली.

यावेळी सचिन पिळगावकर म्हणाले, ‘रणांगण’ या आमच्या आगामी चित्रपटात मी शिक्षण सम्राटाची भूमिका करत आहे. नात्यांशी निगडीत चित्रपट असून नात्यामुळे घडणार्‍या गोष्टींवर तो भाष्य करणारा आहे. उत्स्फूर्त अभिनयातून जी निरागसता निघते ती अभिनय शिक्षणामुळे कदाचित गढूळ होते. म्हणूनच लहान मुलांचे अभिनय आपल्याला जास्त भावतात. राकेश सारंग म्हणाले, या चित्रपटात चार गाणी आहेत. ही चारही गाणी आम्ही चित्रपटाच्या कथानकानुसार तयार केली आहेत. ती वेगवेगळ्या बाजाची गाणी आहेत. शशांक पवार, अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि सचिन पिळगावकर यांनी गाणी संगीतबद्ध केली आहेत.

यावेळी स्मितादेवी जाधव म्हणाल्या, जेव्हा मी कालच्या आणि आजच्या ‘स्त्री’चा विचार करते तेव्हा मला कळते की, आपण सर्व जुन्या पिढीच्या अपग्रेटेड व्हर्जन आहोत. स्त्रियांना अधिकार मिळावा, त्यांना आपली मते मांडता यावीत यासाठी आतापर्यंत अनेक स्त्रिया संघर्ष करत आल्या. त्यामुळेच आजच्या काळातील महिला पुढे जात आहेत. स्त्रियांमध्ये प्रचंड सहनशक्ती असते, ‘स्त्री’ने ठरविलेले काम ती यशस्वीरीत्या पूर्ण करते. तिच्यासाठी जगात काहीही अशक्य नसते. आधुनिकतेची कास धरून ती कल्पना चावलाप्रमाणे अंतराळवीर व प्रतिभा पाटील यांच्याप्रमाणे राष्ट्रपतीसुद्धा होऊ शकते; मात्र, संसार न सोडता. आणि हाच भारताच्या संस्कृतीचा भक्कम पाया आहे. याच संस्कारांमुळे आपण गरुड झेप घेऊ शकतो. या कार्यक्रमाचे संयोजन मधुरा दाते यांनी केले.

Tags : pune When, you, want, act, villain, you, need, skill