Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Pune › नवीन शहराध्यक्षांच्या नावाची प्रतीक्षा कधी संपणार

नवीन शहराध्यक्षांच्या नावाची प्रतीक्षा कधी संपणार

Published On: Jul 06 2018 1:45AM | Last Updated: Jul 06 2018 1:38AMपुणे : पांडुरंग सांडभोर

तारीख पे तारीख अशी अवस्था शहर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या नावाबद्दल गेल्या काही महिन्यांपासून नाही तर वर्षांपासून सुरू आहे. याबाबत पक्षाच्या नेत्यांकडून वेळोवेळी घोषणा करूनही नवीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यास अद्यापही मुहूर्त मिळू शकलेला नाही. त्यामुळे आता ही प्रतीक्षा कधी संपणार, याकडेच सध्या पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या दहा वर्षांपासून खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्याकडे आहे. एवढा प्रदीर्घकाळ अध्यक्षपद मिळालेल्या ते एकमेव अध्यक्षा ठरल्या आहेत. या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांना विधान परिषदेच्या सदस्य, दुसर्‍यांदा राज्यसभा सदस्य अशा महत्त्वाच्या पदावर संधी मिळाली आहे. असे असतानाही त्यांच्याकडील शहराध्यक्षपद त्यांच्याकडेच कायम राहिले. खासदार पदाची मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर खरतर अ‍ॅड. चव्हाण यांनी शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तरीही पक्षाने त्यांच्या खाद्यांवरही धुरा कायम ठेवली, गेल्या दोन वर्षात अध्यक्षपदाच्या बदलाच्या चर्चा सातत्याने झाल्या. पक्षाच्या नेत्यांकडून त्यासंबधीचे संकेतही दिले गेले. मात्र, बदल काही होऊ शकला नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठीच्या इच्छुकांचा वेळोवेळी हिरमोड झाला. आता गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पुन्हा एकदा अध्यक्षपदाच्या बदलांच्या चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीच खुद्द तशी घोषणा केली. त्यानंतर शहरातील पदाधिकार्‍यांनी बैठक घेऊन अध्यक्ष निवडीचे अधिकार पवार यांना दिले. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात नवीन अध्यक्षांची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, याच काळात प्रदेशाध्यक्ष निवड, त्यानंतर राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप यामुळे ही निवड लांबली, त्यानंतर जूनअखेरपर्यंतच्या नवीन मुहूर्ताची घोषणा करण्यात आली, आता, मात्र, तीही मुदत उलटली, त्यामुळे खरच पक्षाला नवीन अध्यक्ष मिळणार का, अशी शंका पक्ष कार्यकर्त्यांकडून उपस्थित केली जाऊ लागली आहे. गेल्या आठवडाभरापासून पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्‍चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असेल तर मग ते जाहीर करण्यास का विलंब केला जात आहे, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

मुळातच पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग़्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महापालिकेत या पक्षाची दहा वर्षे सत्ता होती, असे असतानाही अध्यक्षपदाच्या निवडीचा जो काही खेळ प्रत्येक वेळेस सुरू असतो, तो पक्षाच्या प्रतिमेला नक्कीच शोभनीय नाही. त्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जातात. अध्यक्षपदासाठी पक्षाकडे दुसरा सक्षम असा उमेदवारच नाही की काय म्हणून अशा पद्धतीने वेळकाढूपणा केला जातोय, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. विशेष म्हणजे शहराध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय सर्वंस्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हेच घेतात. प्रदेशाध्यक्ष शक्यतो तरी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात आणि निवड प्रक्रियेत लक्ष घालत नाही, किंबहुना तसे धाडसही दाखवत नाही. असे असतानाही हा होणारा विलंब अनाकलनीय आहे, अथवा त्यामागे राजकारण असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, या सवार्र्ंचा फटका पक्षाला बसत आहे. नवीन नेतृत्त्वाला संधी मिळत नाही. पक्षात तोचतोचपणा आल्याने कामकाजावरही परिणाम होत आहे. बदल हवा आहे, तशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनेची किमान यावेळेस तरी पक्षनेतृत्त्व दखल घेणार आणि पक्षाला नवीन शहराध्यक्ष देणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.