Sun, Apr 21, 2019 13:46होमपेज › Pune › नाशिक फाटा उड्डाणपुलाचा पुण्याकडे उतरणारा रॅम्प कधी खुला होणार?

नाशिक फाटा उड्डाणपुलाचा पुण्याकडे उतरणारा रॅम्प कधी खुला होणार?

Published On: May 09 2018 1:51AM | Last Updated: May 08 2018 11:25PMपिंपरी :  नंदकुमार सातुर्डेकर

नाशिक फाटा उड्डाणपुलाच्या पिंपळे सौदागरकडून मुंबईकडे जाणार्‍या  रॅम्पचे  सोमवारी उदघाटन झाले.  पण पुण्याच्या दिशेने उतरणारा रॅम्प कधी खुला होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पालिकेने अपघातांची शक्यता लक्षात घेऊन ट्रॅफिक मॅनेजमेंट होईपर्यंत रॅम्प खुला न करण्याचे ठरविले असल्याचे समजते.  मात्र या सर्व बाबींची पूर्तता कधी होणार ? हा प्रश्नच आहे.
नाशिक फाटा येथे हिंजवडी ते मोशी रस्ता छेदत असून सुरळीत वाहतूक व सिग्नल विरहीत वाहतूक होण्याच्या दृष्टीने नाशिक फाटा चौकामध्ये उड्डाणपुलाचे नियोजन केले आहे.  मुंबईच्या दिशेला उतरणारा

रॅम्प भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्याहस्ते व महापौर नितीन काळजे यांच्या अध्यतेखाली आयोजित कार्यक्रमात नुकताच खुला केला. हा रॅम्प वाहतूकीसाठी खुला झाल्यामुळे पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड व हिंजवडी या भागाकडून येणार्‍या वाहनांना पिंपरी, चिंचवड, निगडी व मुंबईकडे जाणे सोईस्कर होणार आहे. चौकातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच नाशिकफाटा चौक सिग्नल विरहित करणे शक्य होणार असून नागरिकांना वेळेत पोहचण्यासाठी मदत होणार आहे.

मात्र नाशिक फाटा उड्डाणपुलाचा पुण्याच्या दिशेने उतरणारा रॅम्प खुला करण्यास पालिकेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.  नाशिक फाटा उड्डाणपुलाचा पुण्याच्या दिशेने उतरणारा हा एकेरी रॅम्प खुला करण्याच्या मागणीसाठी  शिवसेनेने 6 एप्रिल 2016 रोजी तीव्र आंदोलन केले होते.  त्यावेळी तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली आंदोलकांची भेट घेऊन हा रॅम्प तातडीने खुला

करण्याचे आदेश महापालिका अधिकार्‍यांना दिले होते.  मात्र त्याला दोन वर्षे होऊन गेली तरी पुलाचा हा रॅम्प खुला झालेला नाही.अपघातांच्या भीतीने पालिका हा रॅम्प खुला करत नसल्याचे समजते यासंदर्भात पालिकेचे बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नाशिक फाटा उड्डाण पुलाचा पुण्याकडे उतरणारा रॅम्प खुला केला तर मुंबईकडून पुण्याला जाणारे लोक व पिंपळे सौदागरकडून पुण्याला जाणारे लोक एकत्र येतील अशा स्थितीत अपघाताचे भय आहे.