होमपेज › Pune › विमानतळाचा घोळ कधी थांबणार ?

विमानतळाचा घोळ कधी थांबणार ?

Last Updated: Feb 25 2020 1:25AM
पुणे : सुहास जगताप
पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेचा सुमारे दहा ते बारा वर्षांपासून सुरू असलेला घोळ संपण्याचे नावच घेईना. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबधी केलेल्या विधानामुळे आणखी घोळात घोळ सुरू झाला आहे.‘विमानतळासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करणार आहे; परंतु तो कोठे होईल हे आताच सांगणार नाही’, असे विधान करून अजित पवार यांनी नवीन घोळ घालण्यास सुरुवात केली.

सर्वच पक्षांची सरकारे या दहा-बारा वर्षांत राज्यात येऊन गेली; परंतु कोणीही हा घोळ कायमस्वरूपी मिटविण्याचा प्रयत्न केलेला नाही. गेल्या भाजप-शिवसेना सरकारने पुरंदर तालुक्यातील सात गावांतील जमीन यासाठी नक्की केली; परंतु जागा नक्की झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनंतरही पॅकेज जाहीर करून भूसंपादनास सुरुवात केलेली नसल्याने या जागेबाबतही आता घोळ सुरू झाला आहे. यापूर्वी खेड तालुक्यातील चार जागा नक्की करण्यात येऊन नंतर त्या रद्द करण्यात आल्या, आता खेड तालुक्यातील ‘सेझ’च्या जागेवर तो होईल, असे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी अजित पवार यांच्या विधानानंतर सांगितले.

या घोळामुळे या प्रकल्पाचा खर्च तर वाढत चालला आहेच; परंतु तो लांबणीवर पडत असल्याने पुणे जिल्ह्याला अत्यंत आवश्यक असलेल्या प्रकल्पाला विलंब होत असल्याने येथील उद्योग-विकासाचे विस्तारीकरण, नवीन रोजगाराच्या संधी, नवीन उद्योग-व्यवसाय उभारणी या सर्वांनाच खीळ बसली, त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणे जिल्ह्याबरोबरच पुणे विभागातील सर्वच जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना तसेच मराठवाड्यासह आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील महाराष्ट्रला लागून असलेल्या भागालाही या आंतरराष्ट्रीय विमान तळाचा उपयोग होऊ शकतो, त्यामुळे राज्यासह लगतच्या राज्याच्या विकासाच्या बाबतही या विमानतळाचे मोठे महत्त्व आहे.

पुणे जिल्ह्याच्या विकासात तर या विमानतळाला फार महत्त्व आहे, ज्या भागात हा विमानतळ होईल, त्या भागातील लोकांना तर पिढ्यानपिढ्या याचा फायदा होणार आहे. यापूर्वीही ज्या भागात असे विमानतळ झाले आहेत त्यांचा नेत्रदीपक असा विकास झालेला आहे.विमानतळामुळे आपल्या भागाचा विकास होईल आणि आपले जीवनमान कायमस्वरूपी उंचावेल हे त्या भागातील जनतेला पटवून देण्यात राज्यकर्ते यशस्वी ठरत नसल्याने विमानतळाला जमिनी देण्यास विरोध होत आहे, या विरोधामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे, आणि राज्यकर्ते ही लोकांना आश्वासने देण्यात गुंग असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

विमानतळांच्या जागांचा घोळ दहा ते बारा वर्षांपासून सुरू असल्याने ‘रियल इस्टेट’ क्षेत्रालाही फटका बसला आहे. विमानतळाच्या जागेची घोषणा झाली की त्या परसरातील जमिनींचे भाव वाढतात आणि त्या परिसरातील प्रकल्प रद्द झाला की ते कोसळतात, त्यामुळे आज पर्यंत ‘रियल इस्टेट’ क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ ही पुणे जिल्ह्याची मोठी गरज असल्याचे दहा वर्षांपूर्वीच सिद्ध झालेले आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे, त्या दृष्टीने आता राज्यकर्त्यांची पावले पडणे आवश्यक आहे.

गारपिटीची दक्षता आवश्यक
उन्हाच्या कडक झळा पाहता या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता मोठी आहेसेे वाटते. मागील अनुभव पाहता कडक उन्हाळा सुरुवातीपासूनच जाणवू लागला, तर अवकाळी पाऊस व गारपिटीची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शेतकर्‍यांना अवकाळी पावसापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तयारी करावी लागेल. कृषी विभागानेही आपल्या कर्मचार्‍यांच्या मदतीने शेतकर्‍यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करावा. या वेळी पावसाळा लांबल्याने खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हातातून गेलाच आहे, आता रब्बी पिके काढणीला येतील, त्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धोका त्यांच्या डोक्यावर आहे. पिके काढणीला आली असल्यास विलंब न लावता त्यांची काढणी पूर्ण करावी आणि संरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. विशेषतः कांदाकाढणी झाल्यानंतर तो काही  शेतांतच ठेवण्याची शेतकर्‍यांची पद्धत आहे; परंतु त्यामुळे घात होऊ शकतो. त्यामुळे कांदा काढणीनंतर लगेचच शेतातून  हटवावा.शेतकर्‍यांनी आपल्यावर असलेल्या अवकाळी आणि गारपिटीच्या टांगत्या तलवारीचे भान ठेवून उपाययोजना करण्याची गरज आहे. 

चाहूल कडक उन्हाळ्याची!
या वेळी कडाक्याची थंडी फार काळ टिकली नाही. थंडी सुरू झाली म्हणेपर्यंत उन्हाळा सुरू झाला. एप्रिल-मेमध्ये ज्याप्रमाणे उन्हाच्या झळा जाणवतात, त्याप्रमाणे त्या फेब्रुवारीतच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उन्हाळा किती उग्र रूप धारण करील हे आताच सांगता यायचे नाही. पाणीटंचाईची झळ या उन्हाळ्यात लागण्याची शक्यता कमी आहे. या वेळी पावसाळा लांबल्याचा हा फायदा आहे. परंतु, कडक उन्हापासून पिकांचे संरक्षण करताना शेतकर्‍यांची मोठी कसोटी लागणार आहे. विशेषतः भाजीपाला पिकांचे संरक्षण करणे फारच कठीण होईल, असे सध्याच्या उन्हाच्या झळा पाहून वाटते.