Tue, Jul 16, 2019 02:22होमपेज › Pune › पंडित ऑटोमोटिव्हच्या कामगारांना न्याय कधी?

पंडित ऑटोमोटिव्हच्या कामगारांना न्याय कधी?

Published On: Jul 04 2018 2:18AM | Last Updated: Jul 04 2018 12:52AMपिंपरी : प्रदीप लोखंडे

ताथवडे येथील पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांना अद्याप न्याय मिळाला नाही. सध्या कंपनीवर प्रशासक नेमला आहे. त्यामुळे नेमकी दाद कोणाकडे मागायची असा 
सवाल पंडित ऑटोमोटिव्हचे कामगार विचारत आहेत. घर खर्च कसा भागवायचा असा सवाल कामगार विचारत आहेत. 

पंडित ऑटोमोटिव्ह कामगारांचे आंदोलन डिसेंबर 2017 पासून आंदोलन सुरू आहे. 120 कामगार आपल्या न्याय हक्‍कासाठी लढत आहेत. कंपनीत कामगारांनी दोन-तीन महिने आंदोलन सुरू ठेवले होते. त्यानंतर कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर कामगारांना कंपनी आवारात आंदोलन करण्यास बंदी घातली. त्यानंतरही कामगारांनी आपले आंदोलन गेटवर सुरूच ठेवले.  याबाबत कामगार उपायुक्‍तांनी मध्यस्थी करून बैठक लावली. या बैठकीकडे कंपनी व्यवस्थापनाने पाठ फिरवल्याने कोणताच तोडगा निघाला नाही. कंपनी व्यवस्थापन कामगारांच्या प्रश्‍नावर उदासीनच असल्याचे चित्र आहे.

कंपनीने कामगारांना पाच महिन्यांपासून रखडलेले वेतन दिलेले नाही. त्या बाबात वारंवार तोंडी व लेखी निवेदन देऊनही कामगारांचा पगार रखडलाच आहे. याच्या विरोधात ऑटोमोटिव्ह सर्व्हिसेस कर्मचारी संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली. कामगारांचा पगार वेळेत देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिला, तरीही कंपनीच्या वतीने या आदेशाचा अवमान केला आहे. कामगारांचा रखडलेला पगार कंपनी व्यवस्थापनाने दिलेला नाही. सध्या कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रशासकांनी नुकतीच नोटिस काढली आहे. त्यामध्ये कोणी कंपनी चालविण्यास उत्सुक आहे का? या बाबत आवाहन केले होते; मात्र याला अद्याप तरी कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र आहे. नवीन मालक कंपनी चालविण्यास आला तर कामगारांचे रखडलेले पगार मिळावेत, अशी मागणी कामगार करत आहेत; मात्र सध्या तरी आपल्या मागण्यांसाठी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्‍न कामगार उपस्थित करत आहेत. कोणताच तोडगा निघत नसल्याने कामगारांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे. या बाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

नवीन मालक आल्यास न्याय मिळणार का?

कंपनी चालविण्यास इच्छुक असणार्‍यांनी संपर्क साधण्याचे आवाहन कंपनीवर नेमलेल्या प्रशासकांनी केले आहे. सध्या तरी यासाठी कोणीच पुढे आल्याचे स्पष्ट नाही. नवीन कोणत्याही संस्थेने कंपनी चालविण्यासाठी पुढाकार घेतला तरी कामगारांची रखडलेली मागणी पुर्ण होणार का? असा सवाल कामगार उपस्थित करत आहेत. नवीन संस्था आल्यास त्यांच्यापुढे आपल्या मागण्यांचे गार्‍हाणे मांडणार असल्याचे कामगार सांगत आहेत.