होमपेज › Pune › पाट्यांसंदर्भातील धोरण कधी?

पाट्यांसंदर्भातील धोरण कधी?

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 12:38AMपुणे : प्रतिनिधी

एकाच ठिकाणी एकाच नावाच्या चार-चार पाट्या नगरसेकांकडून लावण्यात आल्याचे चित्र शहरभर दिसते. पालिकेच्या पैशातून लावलेल्या या पाट्यांना राजकीय पक्षांच्या झेंड्यांचे रंग देऊन खुलेआम पक्षांचा प्रचार केला जात आहे. विशेष म्हणजे याबाबतीत पालिकेचे धोरण अस्तित्त्वात नसल्याचे लवकरच पाट्यांसंबंधी धोरण केले जाईल, अशी घोषणा महापौर आणि सभागृहनेत्यांनी एप्रिलमध्ये केली होती. मात्र अद्याप हे धोरण जाहीर केले नसल्याने ही घोषणा हवेतच विरली आहे. या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी यासंबंधीचे धोरण कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरम्यान लवकरच यासंदर्भात पालिकेचे धोरण केले जाईल, असे आश्‍वासन पुन्हा सभागृहनेत्यांनी आणि पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहे.  

महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध रस्त्यांवर दिशादर्शक कमानी, रस्त्यांची नावे, चौक, पुतळे, उद्याने, ऐतिहासिक वास्तू, नाट्यगृहे, सभागृह, लोकप्रतिनीधींची निवासस्थाने आदी ठिकाणी नावांसह पाट्या लावल्या जातात, असे असतानाही नगरसेवकांकडून पुन्हा याच ठिकाणी पाट्या आणि फलक लावले गेले आहेत. त्यातच चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे एकाच ठिकाणी एकाच नावाच्या चार-पाच पाट्या लावल्या जात आहेत. नगरसेवकांमधील हे ‘पाटीयुद्ध’ त्यावरील ‘संकल्पना’ किंवा ‘सौजन्य’ या ओळीमुळे सुरू झाले आहे.   

पालिकेच्या पैशातून उभारलेल्या कोणत्याही वस्तूवर राजकीय पक्षांचे अस्तित्त्व दिसू नये, असा संकेत आहे. हा संकेत धाब्यावर बसवत नगरसेवकांनी पाट्यांना पक्षाच्या झेंड्यांचे रंग देऊन, पक्षांचा खुलेआम प्रचार सुरू केला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आघाडीवर आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील अनेक पाट्यांवर ‘पुणे महानगरपालिका’ ऐवजी ‘जय श्रीराम’ असे लिहिले आहे. असाच प्रकार शहराच्या इतर भागातही पाहायला मिळतो. पालिकेकडून आमदार, खासदार, मंत्री, महापौर, नगरसेवक, पालिकेतील पदाधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणारे मार्ग दाखविणार्‍या पाट्या लावल्या जातात. हे लोकप्रतिनिधी आजी असताना लावलेल्या पाट्या त्यांचे पद गेल्यानंतर काढल्या जात नाहीत. त्यामुळे सगळीकडे पाट्यांचा सूळसुळाट पाहायला मिळतो.