होमपेज › Pune › ‘वायसीएम’ वैद्यकीय महाविद्यालयाचा मुहूर्त कधी ?

‘वायसीएम’ वैद्यकीय महाविद्यालयाचा मुहूर्त कधी ?

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 10 2018 10:57PMपिंपरी : प्रदीप लोखंडे

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टरांचा ताण कमी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव पुढे आला आहे. त्यामध्ये सध्या 53 पदे भरली जाणार आहेत. त्याची नुकतीच जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. याद्वारे सध्या 24 पदे भरण्यात आलेली आहे. उर्वरीत पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्येकीय अधिकार्‍यांच्या वतीने सांगण्यात आली. 2013 पासून चर्चा चालु असलेल्या महाविद्यालयाला मुहूर्त मिळणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. 

‘वायसीएम’ रुग्णालयात कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत, या करिता तत्कालीन आयुक्‍त डॉ. श्रीकर पदरेशी यांनी ‘वायसीएम’मध्ये स्वतंत्र पदव्युत्‍तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. या बाबत 2013 पासून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली; तसेच नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परवानगी व संलग्नीकरण, राज्य सरकारकडून अध्यापक वर्गासाठीची पदमंजुरी व पात्रता प्रमाणपत्र, डीएमईआर अर्थात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची परवानगी आदींकडून विविध परवानग्या घेतल्या. परंतू, केंद्र शासनाने ग्रीन सिग्नल न दिल्याने आजपर्यंत हे महाविद्यालय  रखडले होते.  महापालिकेमार्फत स्वतंत्ररीत्या सुरू होणार्‍या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शासकीय वेतनश्रेणीनुसार हंगामी स्वरूपात अध्यापकांची 53 पदे भरण्यात येणार आहेत.

नियुक्त्या करताना जेवढी रिक्‍तपदे असतील तेवढ्याच नियुक्त्या केल्या जाणार आहेत. वयोमर्यादेनुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास वयाची अट शिथिल करून ही पदे भरणे आणि सरकारी कार्यालयात सेवेत असलेल्या अधिकार्‍यांना या पदांवर नियुक्‍ती देताना वेतन संरक्षण देणे आवश्यक आहे. ‘वॉक इन इंटरव्ह्यू’द्वारे ही पदे भरण्यात येणार आहेत.  ही भरल्यानंतर वायसीएम मधील डॉक्टर व कर्मचार्‍यांवर कमी ताण येणार असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र हे महाविद्यालय सुरू होण्यालाच खो बसत आहे. अजून दोन वर्षे या प्रक्रियेला लागणार असल्याने तोपर्यंत रुग्णांची हेळसांडच होणार आहे. 

 केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाला पत्र

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या पुढील प्रक्रिया सुरू आहेत. या बाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला पत्र पाठविले आहे. शासनाचे प्रतिनिधी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात तपासणीसाठी येणार आहेत. त्यानंतर या कामाला अधिक वेग येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकार्‍यांकडून देण्यात आली.