तुकाराममहाराजांची पालखी दर्ग्यात विसावते तेव्हा....

Published On: Jun 26 2019 1:45AM | Last Updated: Jun 26 2019 1:06AM
Responsive image


पिंपरी : अश्विनी सातव-डोके 

ज्ञानोबा-तुकोबांचा पालखी सोहळा हा केवळ महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित तर राष्ट्रीय एकात्मतेचा वारसा जोपासणारा सोहळा आहे. इथल्या संत परंपरेने अनिष्ठ रूढी परंपरेवर आपल्या अभंगातून प्रहार करत सामाजिक सलोखा जपला. पायी वारी सोहळ्यात शेकडो वर्षानंतर आजही हा सामाजिक सलोखा जपला जातोय. देहूतील हजरत सय्यद अनगडअली शहा बाबा दर्गा हे याच सामाजिक सलोख्याचं जिवंत उदाहरण आहे. 

जगतगुरु तुकाराममहाराजांच्या पालखीने काल शिळा मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. आजोळघरी इनामदार वाड्यात पालखीचा मुक्काम झाला. मंगळवारी सकाळी वैष्णवांचा मेळा टाळ-मृदंगाच्या गजरात इनामदार वाड्यातून तुकोबारायांच्या पादुकांसह बाहेर पडला. देहूच्या वेशीवर पालखी सोहळा आल्यावर प्रवेशद्वारावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर हा सोहळा हजरत सय्यद अनगडअली शहा बाबा दर्ग्यात विसावला. हा एका भटक्या मुस्लिम सुफी फकिराचा दर्गा म्हणजे तुकाराममहाराजांच्या पालखीचे प्रथम आरती स्थळ. पालखी सोहळ्याचे यंदाचे 334 वे वर्ष आहे. गेली 334 वर्ष याच सुफी फकिराच्या दर्ग्यावर तुकाराम महाराजांची पालखी विसावते. भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेतलेले वारकरी या टाळ-मृदुगांच्या गजरात इथं तुकाराम महाराजांच्या पादुकांची आरती करतात. ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष दर्ग्यात घुमतो अन विठुरायाच्या भेटीच्या ओढीने वैष्णवांचा मेळा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतो. 

तुकाराममहाराजांसोबत देहूत रमले अनगडअली शहाबाबाअनगडअली शहा हे तुकाराम महाराजांचे समकालीन सुफी फकीर. ते देहूत कसे आले याची आख्यायिका सांगितली जाते.  दारोदारी आपल्या वाडग्यात भिक्षा मागून जगायचं, हा  त्यांचा दिनक्रम होता. पण किती ही भिक्षा मागितली तरी त्यांचा वाडगा रिकामा रहात असे. तेव्हा कोणी तरी त्यांना देहूत तुकाराम महाराजांच्या घरी जायला सांगितलं. अनगडअली शहा मजल दरमजल करत देहूत आले खरे, पण तुकारामांचं घर कस ओळखायचं हा प्रश्न पडला. त्यावर प्रत्येक घरासमोर भिक्षा मागू, जिथे वाडगा भरेल ते तुकाराम महाराजांचं घर असं म्हणत त्यांनी देहूत भिक्षा मागायला सुरवात केली. काही घरात भिक्षा मागितल्या एका घराबाहेर ते भिक्षा मागायला उभे राहिले. अन त्या घरातील भिक्षा मिळताच त्यांचा वाडगा पूर्ण भरला. अन हेच तुकाराम महाराजांचे घर याची त्यांना खात्री पटली. त्यानंतर त्यांची अन तुकाराम महाराजांची भेट झाली. पुढे या दोघांमध्ये अनेक चर्चा झाल्या. ज्ञानाची देवाणघेवाण होत राहिली. अन तुकाराम महाराजांसोबत अनगडअली शहा बाबा देहूत रमले. गावाच्या बाहेर माळवाडी जवळ त्यांनी एक झोपडी बांधली अन तिथेच ते रहायला लागले. तुकाराम महाराज आणि अनगडअली शहा या दोघांमध्ये ज्ञानाची देवाण घेवाण होत. सुफी साहित्य आणि कबीर यांचा खोलवर परिचर अनगडअली  शहा यांच्या मुळे तुकाराम महाराजांना झाला. पालखी सोहळ्यात या दर्ग्यात होणारी तुकाराम महाराजांची पहिली आरती ही  केवळ या दोघांमधल्या मैत्रीचं प्रतिक नाही तर पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक सलोख्याच दर्शन आहे. हा सलोखा फक्त पालखी सोहळ्यात नाही तर दररोजच्या जीवनात सुद्धा अंगिकारायला हवाय.