Wed, Apr 24, 2019 21:30होमपेज › Pune › मोबाईल अ‍ॅप करणार व्हिलचेअरचे नियंत्रण 

मोबाईल अ‍ॅप करणार व्हिलचेअरचे नियंत्रण 

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 09 2018 1:14AMपिंपरी : वर्षा कांबळे

शारीरिकदृष्ट्या अपंग असणार्‍या किंवा हालचाल न करता येणार्‍या अर्धांगवायूच्या व्यक्तींना नेहमी दुसर्‍यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. इतर व्यक्तींच्या मदतीशिवाय त्यांना कुठेही जाता येत नाही. अशा व्यक्तींना  स्वावलंबी आयुष्य जगावे यासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एक अ‍ॅप विकसित केले आहे.  जे आता व्हिलचेअरचे नियंत्रण करु शकेल. ‘स्मार्ट व्हिलचेअर’ असे या मोबाईल अ‍ॅपचे नाव आहे.  व्हिलचेअरने अपंग व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सहजपणे जाऊ शकतील 

जिग्नेश राठोड, निनाद निजामपूरकर यांनी त्यांचे प्रा. अनिल लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अ‍ॅप विकसित केले आहे. रोबोटिक्स हे हार्डवेअरचे सॉफ्टवेअर असते.  त्या हार्डवेअरमध्ये एक चीप बनविली आहे. त्याची कनेक्टिव्हीटी रोबोटिक्स हार्डवेअरमध्ये असणार्‍या सॉफ्टवेअरला दिली आहे. हे अ‍ॅप बनविण्यास सहा महिन्याचा अवधी लागला. ही चीप कोणत्याही व्हीलचेअरला बसवून ब्लू टूथने कनेक्ट करावी लागते. कनेक्ट केल्यानंतर चेअरला एक मायक्रो प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यानंतर व्यक्ती जशी कमांड देईल त्याप्रमाणे मायक्रोप्रोसेसर स्वीकारेल आणि चेअर मुव्ह होईल.

अपंग व्यक्तींसाठी असणारी व्हिलचेअर या दुसर्‍या व्यक्तीची मदत घेवून ढकलावी लागते. मात्र, आता या अ‍ॅपव्दारे व्यक्ती स्वत: कमांड देवून ही स्माटचेअर नियंत्रित करेल. यामध्ये जी व्यक्ती हातापायांची हालाचाल करु शकत नाही बोल शकते ती तोंडाव्दारे कमांड देईल मायक्रो प्रोसेसर ती कमांड प्रोसेस करेल. समजा एखादी  व्यक्ती मुकबधीर असेल व चालताही येत नाही. ती टच करुन कमांड देऊ शकते.  एखाद्या व्यक्तीला टच करण्यााठी बोटे काम करत नसतील तर एक्लोमीटरने तो कमांड देऊ शकतो. यामध्ये मोबाईल वरतीखाली किंवा मोबाईल उभा अडवा केला तरी चेअर मागे किंवा पुढे जाऊ शकते. 
जे सैनिक युद्धात अपंग होतात त्यांच्यासाठी खास करुन या विद्यार्थ्यांनी ही स्मार्ट व्हिलचेअर बनविली आहे. याचा उपयोग अर्धांगवायू झालेल्या व्यक्तींनाही होईल. आता अशा व्यक्ती  दुसर्‍यांच्या मदतीची वाट न पाहता स्वावलंबीपणे कुठेही फिरू शकतील. 

आम्ही या चीपमध्ये स्वत:चे कोडींग केले आहे. ही चीप फक्त व्हिलचेअरला फिट करायची आहे. त्यानंतर ही अ‍ॅप मोबाईलमध्ये घ्यायची आहे. आणि ती ब्लू टूथने कनेक्ट करायची आहे. त्यानंतर त्यावर लिस्टमध्ये चेअरचे नाव येईल. ती सिलेक्ट करायची मग बाकी सर्व काम सॉफ्टवेअर करेल. यांच्यामध्ये काही बिघाड झाला तर इमर्जेन्सीचे ऑप्शन दिले आहे. तो सुरुवातीला नंबर विचारेल. यामध्येही कॉल किंवामेसेज असे दोन ऑप्शन दिले आहेत. याव्दारे व्यक्ती मदत मागू शकते. ही चीप कोणत्याही व्हिलचेअरला बसू शकते.   - जिग्नेश राठोड, अभियांत्रिकी विद्यार्थी