Thu, Jul 18, 2019 04:04होमपेज › Pune › व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरचा दुरुपयोग

व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरचा दुरुपयोग

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 1:01AMपिंपरी ः पूनम पाटील

विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रचलित असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरचा आता  दुरुपयोग होऊ लागला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अंधेरीनगरीत आता तरुणाईसह सुशिक्षित वर्गही भरकटू लागला असून, अफवा पसरवण्याचे जलद साधन म्हणून या मेसेंजरचा वापर होत आहे. मागील काही दिवसांत मुले पळवणार्‍या टोळीचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत होता. त्याची शहानिशा न केल्याने त्याचे पर्यवसान एक दुर्दैवी घटनेत झाले. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापराबाबत तरुणाईसह सुशिक्षित वर्गही भरकटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

पोलिस वॉच कितपत प्रभावी ठरणार?

सोशल मिडीयाचा मुळ उद्देश आता मागे पडू लागला असून यामुळे आता नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याने शहरातील ज्येष्ठांनी तसेच तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. लवकरच व्हाटसअ‍ॅप ग्रुपवर पोलीस वॉच ठेवण्यात येणार असला तरी केवळ एवढ्यानेच पुढे होणारी हानी टळणार का तसेच, अफवांचे पीक कमी होणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  केवळ व्हॉटस्अ‍ॅपवरच कारवाई करुन उपयोग नाही तर इतर सोशल मीडियाबाबत ठोस धोरणाची गरज आहे. आज अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गरज नसतांनाही अनावश्यक डेटा फ्री दिला आहे. त्याच्यावर अंकुश कधी ठेवणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 

व्हॉटसअ‍ॅपने आज शहरवासियांसह ग्रामीण भागातील युवकांना तसेच सुशिक्षितांना झपाटले असून यातून अनेक समविचारी गट तयार  झाले आहेत. तेथील युजर्सची संख्याही लक्षणीय आहे. एकीकडे चांगले आध्यात्मिक व चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणारे ग्रुप असून दुसरीकडे विघ्नसंतोषी माणसांचा एक्स्ट्रीम ग्रुप सध्या व्हाटसअ‍ॅपवर अ‍ॅक्टीव्ह आहे. यापुर्वीही अश्‍लील पोस्ट टाकलेल्या युजर्सना तसेच बदनामी करणारे मजकुर टाकणार्‍यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परंतु, तरीही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे पोलिस वॉच कितपत प्रभावी ठरणार याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. 

पोस्टची करणार शहानिशा

ग्रुपवरील पोस्ट कशी पुढे पाठवली जाते  यावर आता करडी नजर ठेवण्यात येणार असून, योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. असे असले तरी ‘बडी कॉप’चा प्रयोग सपशेल फसला, तसा हा पोलिस-वॉच कितपत प्रभावी ठरणार, याबाबत अनेक शंका कुशंकांना सोशल मीडियावरच उधाण आले आहे.