Mon, Jun 24, 2019 16:45होमपेज › Pune › बाद बसेसचे करायचे काय?

बाद बसेसचे करायचे काय?

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 12:36AMपुणे : नवनाथ शिंदे

शहरातील सर्वाधिक प्रवाशांची बसने ने-आण करणार्‍या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) ठेकेदारांच्या नादुरुस्त बसेसचे ग्रहण लागले आहे. ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील काही बसेस वारंवार रस्त्यांवर बंद पडणे, बसचा अपघात होणे, नादुरुस्त बस वाहतुकीसाठी वापरणे, अनफिट बसेसची माहिती प्रशासनाला न देता प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल अक्षम्य चुका करणार्‍या ठेकेदारांवर महामंडळ मेहेरबान का आहे, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करण्याची हमी घेतलेल्या महामंडळाला बस ठेकेदारांकडूनच नियमांना फाटा दिला जात आहे. पावसाळ्यापूर्वी ठेकेदारांच्या ताब्यातील 653 बसेसची वाहतुकीच्या दृष्टिकोनातून तपासणी होणे आवश्यक होते. मात्र, बस तपासणीला प्राधान्य देण्यात न आल्यामुळे मागील काही दिवसांपासून ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे. पीएमपीएमएल आणि ठेकेदारांच्या  दिवसाला सरासरी 140 बसेस बंद पडत आहेत.

तीन दिवसांत ठेकेदारांच्या ताब्यातील बसेस बंद पडण्याचे प्रमाण 10 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. देखभाल दुरुस्तीअभावी बस अपघात होणे, अनफिट बस रस्त्यांवर चालविणे, ठरवून दिलेले प्रवासी थांबे चुकविणे, भंगारातील बस प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्याच्या प्रकारामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खिळखिळी झाली असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनांनी दिली आहे. ठेकेदाराच्या ताब्यातील पीएमपीएलच्या बसचा वारजे पुलाजवळ अपघात झाला होता. त्यानंतर ठेकेदारांच्या सर्व बसेसची तातडीने तपासणी करून अहवाल तयार करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र, 23 जुलै उजाडला तरीही बसेसचा तपासणी अहवाल ठेकेदारांनी प्रशासनाकडे सादर केला नाही. त्यामुळे महामंडळाला ठेकेदारांच्या असुरक्षित बससेवेला मूकसंमती दिली आहे का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. एवढेच नाही तर  घटना घडल्यानंतर कारवाईची घाई करणारे महामंडळ वरातीमागून घोडे दामटत असल्याचे 
दिसून  येत आहे.