Thu, Jul 18, 2019 22:06होमपेज › Pune › अबब... या प्लास्टिकच नक्‍की करायचं काय?

अबब... या प्लास्टिकच नक्‍की करायचं काय?

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 12:31AMपुणे : प्रतिनिधी

प्लास्टिकवर शासनाने बंदी घातल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरात प्लास्टिक कारवाईची जोरदार मोहीम राबविली. गेल्या दीड-पावणे दोन महिन्यांत तब्बल 35 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्यातून महापालिकेच्या तब्बल 177 कोट्या तुडुंब भरल्या; मात्र जप्त केलेल्या या प्लास्टिकची नक्‍की कशी विल्हेवाट लावायची यासंबंधीची कोणतीच स्पष्टोक्ती शासनाकडून दिली गेली नसल्याने आता प्लास्टिकच नक्की करायचं काय, असा प्रश्‍न प्रशासनापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे आता कारवाईतही हात आखडता घेण्याची वेळ आली आहे.

पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यासंबंधीची अधिसूचना काढल्यानंतर गुढीपाडव्यापासून (18 मार्च) त्याची अंमलबजावणी सुरू झाली. शासनाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने लगेचच प्लास्टिक बंदीवर कार्यवाही सुरू केली. त्यासाठी घनकचरा विभागाने तब्बल सव्वा दोनशे अधिकारी कर्मचार्‍यांचा फौजफाटा त्यासाठी कामाला लावला. पहिल्या टप्प्यात जनजागृती करून नागरिकांकडून स्वत:हून प्लास्टिक गोळा करून घेण्यात आले. त्यानंतर थेट कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. त्यानुसार बुधवार अखेरपर्यंत महापालिकेकडे तब्बल 35 टन प्लास्टिक जमा झाले आहे. शहरात पालिकेच्या विविध भागांमध्ये ज्या 177 कोठ्या आहेत. त्याठिकाणी हे कारवाई करून जप्त केलेले प्लास्टिक ठेवण्यात आले आहे. मात्र, आता या सर्व कोठ्या प्लास्टिकने तुडुंब भरल्या आहेत. त्यामध्ये ठेवण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यातच राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, मात्र, तो घेताना अस्तित्वातील प्लास्टिकची नक्की कशी विल्हेवाट लावायची याबाबत काहीही मार्गदर्शक सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे जमा झालेल्या प्लास्टिकच नक्की करायचा काय, असा प्रश्‍न उभा राहिला असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता प्रशासन दुहेरी कोंडीत सापडले आहे.

मोहीम सुरू; पण प्लास्टिक ठेवणार कुठे...

एकीकडे प्लास्टिकमुळे पालिकेच्या सर्व कोठ्या पूर्णपणे भरल्या असतानाच दुसरीकडे प्लास्टिक गोळा करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली आहे. पुढील दोन महिने ही मोहीम सुरू राहणार आहे, मात्र, त्यातून जमा होणारे प्लास्टिक नक्की ठेवायचे कुठे, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे प्लास्टिक कारवाई आणि मोहीम दोन्हीही केवळ नावापुरत्याच राबविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.