Mon, Apr 22, 2019 16:28होमपेज › Pune › 28 कोटी रुपयांच्या ‘एचसीएमटीआर’ची गरज काय?

28 कोटी रुपयांच्या ‘एचसीएमटीआर’ची गरज काय?

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 1:23AMपिंपरी : प्रतिनिधी

शहरातील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा या ‘एचसीएमटीआर ’ रिंग रेल्वेच्या 30 मीटर आरक्षित जागेवर बेकायदेशीरपणे महापालिका रस्ता बनविणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, राष्ट्रीय हरित लवाद या सर्व विभागांची मंजुरी नाही. सदरचा रस्ता     बनविण्यासाठी एम-एस मातेरे कंपनीला नियमबाह्य पद्धतीने, सर्वानुमते ठराव मंजूर न करता 28 कोटी रुपयांची कामाची निविदा मंजूर केलेली आहे. 18 मीटर विस्तृत रस्ता उपलब्ध असताना काळेवाडी फाटा ते कोकणे चौक एचसीएमटीआर रस्त्याची लगीनघाई का? असा संतप्त सवाल रोड बाधित रहाटणीच्या राहिवाशांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेला आहे. 

पिंपळे सौदागर मधील वाहतुक कोंडी हेच रस्ता बनविण्याचे कारण आहे का? स्थानिक राजकीय मंडळींचा वैयक्‍तीक स्वार्थ या बाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असेही तेथील स्थानिक रहिवाशी म्हणाले. सदरच्या रस्त्याच्या बाजूला असणार्‍या कित्येक एकर मध्ये असणारी बांधकाम सहभागीदारी सुद्धा महाराष्ट्र   शासनाने पडताळणे आवश्यक आहे.प्रकल्प प्रस्तावित असताना त्या जागेचा म्हणजेच जवळ-जवळ 26 किलोमिटर परिसरातील जागेच्या टीडीआर विषयी चौकशी होणे आवश्यक आहे. प्रकल्प मंजुर नसताना महापालिकेने टीडीआर हस्तांतरित करणे बेकायदेशीर आहे. सदरचा रस्ता बनविण्यामागे असणार्‍या खर्‍या कारणापर्यंत पोचून महाराष्ट्र शासनाने तसेच विधी विभागाने चौकशी करणे आवश्यक आहे. या रस्त्यामागे टीडीआर घोटाळा असू शकतो, अशी तक्रार येथील रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. पिंपळे सौदागरमधील वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या 18 मीटर जागेचा वापर केल्यास नागरिकांच्या कररूपी 28 कोटी रुपयांच्या उधळपट्टीची आवश्यकता नाही. 

पर्यायी मार्गासाठी अनेक महत्त्वाच्या बाबी असल्याची नोंद या वेळी  रहिवाशांनी नमूद केली. सध्या काळेवाडी ते कोकणे चौक दरम्यान रस्त्यांचे उत्तम जाळे आहे. 45 मीटर औंध बीआरटी रस्ता, रहाटणी तलाठी ऑफिस ते रहाटणी फाटा 18 मीटर रोड, 45 मीटर पिंपरी कडून येणारा बीआरटी रोड वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत.सध्याच्या नियोजित एचसीएमटीआर प्रमाणे रस्ता बनवल्यास   कोकणे चौकातून येणारी वाहतुक 15 मीटर रस्त्यावरून 7.50 मीटर मीटर रस्त्यामध्ये समावणार नाही. त्यामुळे पुढे काळेवाडी चौकात वाहतुक कोंडी वाढणारच आहे. कासारवाडी, पिंपळेगुरव, पिंपळे-सौदागरकडून येणार्‍या वाहतुकीस पर्यायी मार्ग हा 18 मीटर असलेला रहाटणी तलाठी ऑफिसचा मार्ग सोईस्कर ठरेल.

सदरच्या मार्गामुळे नाममात्र 1500 मीटर अंतर वाढेल; परंतु वाहतुक कोंडी प्रश्न मिटून जाईल. पिंपरी, चिंचवड, थेरगाव, पिंपरी कॅम्प या परिसरातून येणार्‍या वाहनांमुळे काळेवाडी चौकात मोठी वाहतुक कोंडी होत असते. एचसीएमटीआर बनविल्यामुळे कोंडीत अजून भर पडणार आहे. त्यापेक्षा उपलब्ध रस्त्याचा वापर करणे आवश्यक. जनतेच्या कररूपी पैश्यांची नियमबाह्य रस्ता बनवून उधळपट्टी करणे घटनाबाह्य ठरते. या बाबत समिती समन्वयक रेखा भोळे म्हणाल्या की, गेल्या 295 दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील 3500 पेक्षा जास्त कुटुंबे हक्‍कांच्या घरासाठी संघर्ष करीत आहेत. रहाटणी परिसरातील नियमबाह्य अतिक्रमण   कार्यवाहिमुळे 22 कुटुंब सध्या रस्त्यावर आलेली आहेत. सर्व शासकीय कागदपत्रीय नोंदी असताना घरांवर हातोडा मारणे सरकारी वेशातील दादागिरीच आहे.समिती समन्वयक माऊली जगताप म्हणाले की, उपलब्ध असलेल्या 18 मीटर रस्त्याची पाहणी वाहतुक विभाग, बीआरटी अभियंता, आयुक्‍तपिंपरी, स्थानिक नगरसेवक यांनी संयुक्‍तीकरित्या करून पर्यायी मार्ग म्हणून  विचारात घेणे रास्त ठरेल. पिंपळे सोदागरमधून सरळ रहाटणीच्या ठिकाणी काही मिनिटात विनाअडथळा पोचत आहे.

Tags :  Pimpri,  need, HCMTR, worth, Rs 28 crores