Wed, Jun 26, 2019 18:07होमपेज › Pune › साम-दाम-दंड-भेद ही कसली कुटनीती?

साम-दाम-दंड-भेद ही कसली कुटनीती?

Published On: May 31 2018 1:45AM | Last Updated: May 31 2018 1:21AMपिंपरी : प्रतिनिधी

राज्यभरात सत्ताधारी भाजपची दादागिरी सुरू आहे. कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक जिंकण्यासाठी साम-दाम-दंड, भेद याचा वापर करा, असे कार्यकर्त्यांना सांगतात. साम-दाम-दंड-भेद म्हणजे कुटनीती आहे, असे सांगत मुख्यमंत्री या कृतीचे समर्थन करतात. याला कसली कुटनीती म्हणायचे, असा प्रश्‍न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरी येथे केला. पालघर आणि भंडारा, गोंदिया मतदारसंघात ईव्हीएम मशिन बंद पडल्या, या मशिन वातावरणातील उष्णतेमुळे बंद पडल्या असे कारण देताय, याआधी हिट नव्हती का असाही प्रश्न त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता सभेच्या पूर्व नियोजनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील विधानसभानिहाय बैठका बुधवारी (दि. 30) झाल्या. या वेळी भोसरीतील आढावा बैठकीत ते बोलत होते. 

याप्रसंगी राष्ट्रवादीचे  शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, मोहिनी लांडे, हनुमंत गावडे, महंमद पानसरे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, नाना लोंढे,  संजय वाबळे, राहुल भोसले,  पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, सुलक्षणा धर, अनुराधा गोफणे, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, गीता मंचरकर, प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, मोदींच्या सत्ताकाळात कोणताच समाजघटक समाधानी नाही. राज्यावर कर्जाचा बोजा वाढतो आहे. तो पाच लाख कोटींवर जाईल, अशी स्थिती आहे. नोटाबंदी व ‘जीएसटी’मुळे व्यवहार थंडावल्याचे दिसत आहे. नोटाबंदीनंतर किती काळा पैसा बाहेर आला? असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला.गेले 16 दिवस पेट्रोलची किंमत वाढतेच आहे. इतर राज्यांत पेट्रोल महाराष्ट्रापेक्षा 12 ते 15 रुपये स्वस्त आहे.  महाराष्ट्रातल्या जनतेने काय गुन्हा केलाय? शेतकरी, गृहिणी कोणीच सुखी नाही. पोलिस आयुक्त कार्यालय देऊन फायदा नाही, चांगला पोलिस आयुक्तही द्या.  

संत तुकारामनगर येथे भाजप नगरसेविकेच्या त्रासाला कंटाळून सचिन ढवळे या टपरी व्यावसायिकाने केलेली आत्महत्या, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्या जाळण्याचे प्रकार, चिंचवडला आकाश लांडगे या तरुणाची हत्या, महिलांवरील अत्याचार याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली.भिकार्‍यालाही सन 2022 पर्यंत 3 लाखांत घर देण्याच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेची पवार यांनी खिल्ली उडवली. पाकिस्तानातून साखर आयात करण्याच्या धोरणावरही त्यांनी कडाडून टीका केली.

शास्तीकर माफीची ऑर्डर पाहावी लागेल 

शास्तीकर माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे सांगितले जात आहे; मात्र खरेच ऑर्डर काय येते, लोकांना काय भरावे लागते, हे पाहावे लागेल. कारण अनधिकृत बांधकामे नियमितचा तसेच कर्जमाफीचा अनुभव चांगला नाही. कुणालाच फायदा होऊ नये, अशा खोचा हे मारून ठेवतात अशी टीका अजित पवार यांनी केली.