Fri, Apr 26, 2019 01:42होमपेज › Pune › ठेकेदारांवर ‘पीएमपी’ची मेहेरबानी कशासाठी?

ठेकेदारांवर ‘पीएमपी’ची मेहेरबानी कशासाठी?

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:25AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिहवन महामंडळाला (पीएमपीएल) खासगी ठेकेदार डोईजड झाले आहेत. बसेसला वारंवार आग लागणे, मेंटनन्सअभावी बसचा अपघात होणे, अनफिट बस रस्त्यांवर चालविणे अशा प्रकारांमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवावर उदार होणार्‍या ठेकेदारांचा मस्तवालपणा पीएमपीएल महामंडळ खपवून का घेत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पीएमपीएल महामंडळाच्या वतीने चार ठेकेदारांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील विविध रस्त्यांवर 653 बसेसच्या माध्यमातून प्रवाशांची ने-आण केली जात आहे. वेळच्यावेळी बसचा मेंटनन्स न तपासणे, वाहनांची योग्यता तपासणी प्रमाणपत्र नसणे, अग्निविरोधी यंत्रणा सक्षम न करणे असे प्रकार खासगी ठेकेदारांकडून होत असल्याचे झालेल्या अपघातांवरुन आढळून आले आहे. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 13 बसेसला आग लागल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यानुसार पीएमपीएल महामंडळाने संबधित ठेकेदारांना वेळोवेळी बस मेंटनन्सबद्दल सूचना केल्या होत्या. मात्र, अपघात घडल्यानंतरच महामंडळाच्या सूचनांकडे लक्ष देणार्‍या ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

खासगी भाडेतत्त्वावर चालविण्यात बस मेंटनन्सअभावी 2 जुलैला अपघातग्रस्त झाली होती. प्राथमिक तपासानुसार बसचा मेंटनन्स योग्य नसल्यामुळे स्टेअरिंगचा रॉड तुटून अपघात झाला. सुदैवाने 30 ते 35 प्रवाशांचा जीव वाचला; मात्र, पीएमपीएल महामंडळ आणि खासगी ठेकेदार फक्त पैसे कमविण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षितेशी का खेळ करत आहेत, असा सवाल प्रवासी संघटनांनी विचारला आहे. पीएमपीएल बसने प्रवास करण्यार्‍या प्रवाशांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे खासगी ठेकेदारांकडून प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य ती खबरदारी न घेतल्याने अपघातांचा आलेख वाढत चालला आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पीएमपीएल व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्याशी संपर्क केला असता, त्या बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. पुलाच्या कठड्याला धडकून खासगी तत्त्वावरील बसचा अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर कारणे शोधण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाची वरिष्ठ पातळीवर तातडीची बैठक पार पडली. मात्र, त्यात फक्त कारणांची चर्चा झाली. अशा प्रकारचे अपघात होऊच नयेत यासाठी प्रशासन ठेकेदारांचे कान पिळण्यास मागेपुढे का पाहत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ठेकेदारांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

खासगी तत्त्वावर चालविण्यात येणार्‍या बसेसचा मेटनन्स तपासणे, फिटनेस करणे, अग्निसुरक्षा यत्रंणा कार्यन्वित ठेवणे, आपत्कालीन मार्ग, खुर्च्या, छत सुस्थितीत ठेवणे ठेकेदाराची जबाबदारी आहे. मात्र, यासंदर्भात महामंडळाने विचारलेल्या माहितीस ठेकेदारांकडून कोलदांडा दिला जात आहे. महामंडळाला बसची नेमकी स्थिती माहिती नसल्यामुळे, प्रवाशांच्या सुरिक्षत प्रवासाबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.