Sun, Jul 21, 2019 16:30
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › स्त्यावरील भंगार वाहनांचे करायचं काय ?

स्त्यावरील भंगार वाहनांचे करायचं काय ?

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:48PMपिंपरी : प्रतिनिधी

स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेल्या पिंपरी- चिंचवड शहरात वाहतुक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरातील विविध भागातील मुख्य चौकात नियोजनाअभावी आधीच वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यात आता रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची भर पडली असून याकडे महापालिका प्रशासन आणि वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शहरात अस्वच्छता पसरत असून वाहतुकीला अडथळा होत आहे. या वाहनाचा गैरवापर होउन अनुचित प्रकार घडण्याची भिती नागरीकांनी व्यक्त केली आहे. 

वाहतुककोंडी  दूर करण्यासाठी महापालिका आणि वाहतुक पोलिसांमध्ये मात्र समन्वयाचा अभाव दिसत असून दोघंही अशा वाहनांवर कारवाईबाबत सुस्त असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागात रसत्याच्या कडेला तसेच फुटपाथवर अनेक वाहने वापराविना पडून आहेत. गेली कित्येक महिन्यांपासून उभ्या असलेल्या या वाहनांचे आता भंगारमध्ये रुपांतर झाले आहे. मात्र तरीदेखील महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून या वाहनांकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करत आहे. 

एकीकडे बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तर, दुसरीकडे मात्र  शहरातील बालाजीनगर, भोसरी, इंद्रायणी नगर, नेहरुनगर, पिंपरी, उद्ममनगर भागात बेवारस वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शहरातील काही रस्त्यांवर कारवाईची न भीती बाळगता राजरोसपणे रस्त्यावरच नादुरुस्त तसेच  अपघातग्रस्त वाहने लावण्यात येतात. अर्थातच यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. अशा प्रकारांमुळे रस्तेही अरुंद होत आहेत. तसेच शहराचे विद्रुपिकरण होत आहे. या बाबत वारंवार तक्रार करुनही या वाहनावंर कारवाई करण्याबाबत महापालिका सुस्त आहे तर वाहतुक पोलिसही उदासिन असल्याचे दिसून येत आहे. 

ती वाहने जप्त करावीत

एकीकडे शहर स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत असताना अशा भंगार वाहनांमुळे अस्वच्छतेत भर पडत आहे, त्याकडे मात्र पालिकेचाच कानाडोळा होत आहे.  या उभ्या वाहनांवर तसेच अवतीभवती कचरा साठून तो कुजून दुर्गंधी पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोणाचीही मालकी नसलेली वाहने रस्त्यावर पडून राहतातच कशी असा प्रश्न नागरीकांना पडू लागला आहे. अशा वाहनांबाबत सर्वेक्षण करुन अशी वाहने आढळ्ल्यास ती वाहने जप्त करावीत व वाहनमालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

वाहनमालकांवर कारवाई करावी

शहरातील रस्त्यालगत उभ्या असलेल्या नादुरुस्त वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा व शहराचे विद्र्पीकरण होत असून वाहतुकीला अडथळा ठरणार्या वाहनाच्या मालकांचा शोध घेण्यात यावा व त्यांच्यावर दंडात्मक कारवई करण्यात यावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे. 

गॅरेजवाल्यांवर कारवाई करावी

अनेक गॅरेजचे मालक किंवा कारागीर दुरुस्तीला आलेली वाहने रस्त्यावरच उभी करुन देतात. महिनोमहिने रस्त्यावरच ती वाहने पडून राहतात. त्यामुळे अपघात होतात. त्यांच्यावरही कारवाई केल्याने अशा प्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे.