Sat, Apr 20, 2019 10:36होमपेज › Pune › दापोडी-निगडी ‘बीआरटी’च्या सुरक्षेचे काय?

दापोडी-निगडी ‘बीआरटी’च्या सुरक्षेचे काय?

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 1:09AM

बुकमार्क करा
पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

बराच काळ रेंगाळलेल्या निगडी ते दापोडी ‘बीआरटी’साठी लगीनघाई सुरू आहे. येत्या दि. 2 जानेवारीला चाचणी घेण्यात येणार आहे; मात्र पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेले मेट्रोचे काम, ग्रेडसेप्रेटरमुळे ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आऊट’च्या ठिकाणी असलेली अपघाताची शक्यता लक्षात घेता, या मार्गावर ‘बीआरटी’ सुरू करणे अपघातास निमंत्रण ठरणार आहे. 
पुण्यात संगमवाडी ‘बीआरटी’ मार्गातून भरधाव वेगाने जाणार्‍या टेम्पो व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघांचा शनिवारी मृत्यू झाला. असे अपघात टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेस उपाययोजना करावी लागणार आहे.

वीस लाख लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ‘बीआरटी’ प्रकल्प हाती घेण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘बीआरटी’ प्रकल्पास 2010 मध्ये मंजुरी मिळाली. 2013 मध्ये अनुदान मिळाले. सन 2014 मध्ये काम सुरू झाले; मात्र आजवर केवळ सांगवी-किवळे (औंध-रावेत) आणि नाशिक फाटा ते वाकड या दोन मार्गांवरच ‘बीआरटी’ धावत आहे.

दापोडी ते निगडी ‘बीआरटी’साठी तत्कालीन आयुक्त राजीव जाधव, दिनेश वाघमारे यांनी ‘तारीख पे तारीख’ देत दिवस ढकलले. पालिकेने 30 सप्टेंबर, 30 ऑक्टोबरची दिलेली डेडलाईन संपली; मात्र अजून मुहूर्त मिळालेला नाही. या मार्गावरील ‘बीआरटी’साठी बसथांबे, डेडिकेटेड लेन यावर साडेचोवीस कोटी रुपये खर्च झाला आहे. ‘बीआरटी’ प्रतीक्षेत आहे. आता मात्र या मार्गावर ‘बीआरटी’ सुरू करण्यासाठी पालिकेची लगीनघाई सुरू आहे. 

येत्या मंगळवारी (दि. 2 जानेवारी) चाचणी घेण्यात येणार आहे; मात्र आज येरवड्यात संगमवाडी ‘बीआरटी लेन’मध्ये भरधाव वेगात जाणार्‍या टेम्पोची समोरून येणार्‍या दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे-मुंबई महामार्गावरील ‘बीआरटी’बाबत भय निर्माण झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेडसेप्रेटरमुळे ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आऊट’च्या ठिकाणी असलेली अपघाताची शक्यता लक्षात घेता, या मार्गावर ‘बीआरटी’ सुरू करणे अपघातास निमंत्रण देणारे ठरणार आहे. 

सन 2014 मध्ये शिवसेनेने याबाबत आयुक्तांपुढे अ‍ॅनिमेशन तंत्राच्या साह्याने सादरीकरण केले होते. त्याची दखल घेऊन त्या मार्गाचे पालिकेने ‘सेफ्टी ऑडिट’ केले आता आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महामार्गावरील ‘बीआरटी’ प्रकल्प सुरक्षित व्हावा यासाठी चालकांना प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे; मात्र या मार्गावर सध्या मेट्रोचेही काम सुरू असल्याने वाहतुकीसाठी अतिशय चिंचोळा रस्ता उपलब्ध आहे.  त्यात ‘बीआरटी’ धावणार असल्याने  नागरिकांना या मार्गावर ‘बीआरटी’मुळे अपघात होण्याच्या भयाने ग्रासले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून शक्यतो प्रवास टाळणे आणि शक्य तिथे अंतर्गत मार्गाचा वापर करणे हाच उपाय उरला आहे.