Mon, Apr 22, 2019 06:02होमपेज › Pune › भाई, पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषणाचे काय?

भाई, पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषणाचे काय?

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 13 2018 12:55AM

बुकमार्क करा
पिंपरी : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असणार्‍या नद्यांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया न करता 71 दशलक्ष लिटर दूषित पाणी सोडले जात आहे. त्यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. औद्योगिक पट्ट्यातील रसायनयुक्त पाणी मिसळून नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास येत असताना, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे लक्ष का जात नाही, असा सवाल आता शहरवासीयांनी करण्यास सुरुवात केली आहे.

कोल्हापूर महापालिकेची सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी अतिवृष्टीमुळे फुटली. त्यामुळे शहरासह गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबतची माहिती मिळताच पर्यावरणमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या यंत्रणेमार्फत त्याचा अहवाल मागविला. महापालिका यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली.

मात्र, हे प्रदूषण रोखण्यात महापालिका यंत्रणेकडून उशीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे येथे झालेल्या विभागाच्या बैठकीतच महापालिकेवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. कोल्हापूर हे धार्मिकस्थळ असल्यामुळे पर्यावरणमंत्र्यांनी महापालिकेला प्रदूषणाबाबत धारेवर धरले; परंतु देशाच्या कानाकोपर्‍यातून नोकरीनिमित्त वास्तव्यास असणार्‍या नागरिकांबरोबर इंद्रायणी, पवना नदीतील जलचरांचे जीवन नदीत मिसळत असलेल्या सांडपाणी आणि रासायनमिश्रित पाण्यामुळे धोक्यात आले आहे.

मोशी परिसरात गुरुवारी (दि.11) महापौरांनी इंद्रायणी नदीची पाहणी करून प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्यामुळे नदीची पाहणी करून पर्यावरण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरचा प्रश्‍न कानी पडताच रामदास कदम यांनी त्वरित कारवाई केली, तर मग जगाच्या नकाशावर औद्योगिकनगरी असणार्‍या पिंपरी-चिंचवडच्या प्रदूषणावर पर्यावरणमंत्री का गप्प आहेत, असा सवाल पिंपरी-चिंचवडकर उपस्थित करत आहेत. शहरातील शिवसैनिक याबाबत मूग गिळून गप्प का, असा सवालही शहरवासीय करत आहेत.