Mon, Jun 24, 2019 21:22होमपेज › Pune › ‘वेस्ट टू एनर्जी’ची निविदा प्रक्रिया केली हॅक 

‘वेस्ट टू एनर्जी’ची निविदा प्रक्रिया केली हॅक 

Published On: Apr 24 2018 1:40AM | Last Updated: Apr 24 2018 1:12AMपिंपरी : प्रतिनिधी

सत्ताधारी भाजप शहरात राबवू पाहत असलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प हा वेस्ट टू मनी प्रकल्प आहे. भारतात कुठेही यशस्वी न झालेला हा प्रकल्प फसला तरी सत्ताधार्‍यांना त्याचे काही देणेघेणे नाही. त्यातून चार पैसे कमावणे, हाच त्यांचा हेतू असल्याचा आरोप शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

प्रकल्प राबवताना चार नामवंत कंपन्यांना टेंडर भरू नका म्हणून धमकवण्यात आले. टेंडर प्रक्रिया हॅक केली गेली.   संगणकात किडे असणार्‍यांनी पालिकेचे संगणक अधिकारी नीलकंठ पोमन यांच्या समवेत बसून एका  कंपनीचे टेंडर भरल्याची चर्चा असून टेंडर प्रक्रियेत आयुक्तांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याची टीकाही त्यांनी केली. पिंपरीतील एका हॉटेलमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेस खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख योगेश बाबर, भगवान वाल्हेकर, धनंजय आल्हाट, रोमी संधू आदी उपस्थित होते.

या वेळी खा. आढळराव पाटील म्हणाले की, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामुळे आता सुगंधी वास येणार, अच्छे दिन येणार असे स्वप्न दाखवले जात आहे.  पण या केवळ भूलथापा आहेत. हा प्रकल्प राबविणे म्हणजे जनतेच्या  पैशाचा अपव्यय आहे.  मागे यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती.  त्यावर हालचाली झाल्या. पण, क्लीनचिट दिली गेली, अशी खंत खा. आढळराव पाटील यांनी व्यक्त केली. ज्यांना काही कळत नाही त्यांच्या हाती पालिकेचा कारभार गेला असल्याची टीकाही त्यांनी केली.

आ. लक्ष्मण जगताप व आ. महेश लांडगे यांनी मावळ व शिरूर मतदारसंघावर भाजप दावा करणार असल्याचे नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगितले होते.   त्याबाबत विचारले असता त्यांनी मोदी, अमित शहा यांच्यासाठी काही जागा सोडायला हव्यात,  असे मिश्कील उत्तर आढळराव पाटील यांनी दिले. मात्र ओबामा उभा राहिला तरी मी निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, नदीसुधार योजनेचा फज्जा उडाला आहे.  शास्तीकर माफीच्या अध्यादेशाची लोक वाट पाहत आहेत.  याआधी पालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने केला नाही. एवढा मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रियेत साखळी करून भ्रष्टचार चालू आहे.  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही आत्मपरीक्षण करावे असा सल्ला खा. बारणे यांनी दिला.बोपखेल पुलासाठीची श्रेयवादाची लढाई योग्य नव्हे, असा टोला त्यांनी भाजप शहराध्यक्ष आ.  लक्ष्मण जगताप यांचे नाव न घेता हाणला.