Mon, May 27, 2019 07:53होमपेज › Pune › उद्योगनगरीत तुकोबांचे जल्लोषात स्वागत

उद्योगनगरीत तुकोबांचे जल्लोषात स्वागत

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 06 2018 11:16PMपिंपरी : प्रतिनिधी

भगवे झेंडे, टाळ-मृदंगाचा गजर, मुखी विठू माउलींचा नामघोष व अंतरी विठुरायाच्या भेटीची आस, अशा भक्तिमय वातावरणात भक्तिरसात तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (दि.6) उद्योगनगरीत जल्‍लोषात स्वागत झाले. यावेळी निगडीतील भक्ती-  शक्ती चौकात जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी जनसागर लोटला होता. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत निघालेल्या वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण आले होते. 

महापौरांनी केले पालखी रथाचे सारथ्य 

देहूतील इनामदार वाड्यातून सकाळी पालखीचे प्रस्थान ठेवले. महाआरती तसेच देहूरोड येथील नागरिकांचे आदरातिथ्य स्वीकारून व देहूकरांचा निरोप घेऊन पालखी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकात दाखल झाली. निगडीतील भक्ती -शक्ती चौकात उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात  महापालिकेच्या वतीने संत तुकारामांच्या पालखीतील दिंडी प्रमुखांचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर काळजे यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. राज्यभरातील दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. या दिंड्यांचे ताडपत्री देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुखी विठुनामाच्या गजरात उत्साही वातावरणात एकापाठोपाठ एक दिंड्या भक्ती-शक्ती चौकात दाखल होत होत्या. या पालखीचे शहरवासीयांनी उत्साहात स्वागत केले.

पालखीचे दर्शन घेण्यासाठी तसेच स्वागतासाठी दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. पालखी सोहळ्यासाठी विशेषत: महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. यामुळे वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण आले होते.  रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या वारकर्‍यांची रांग, टाळ-मृदुंगाचा गजर व अधूनमधून पडणार्‍या रिमझिम पावसात वारकर्‍यांचा सागर असे मनोहारी दृष्य औद्योगिक नगरीने अनुभवले. सोहळ्यात शहरातील चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पारंपरिक वेशात विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश दिला. भाविकांच्या दर्शनानंतर पालखीने आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम केला. आकुर्डी येथे पहिला मुक्काम करून आज पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. 

उच्चशिक्षित युवकाचा वारीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश

दिवसेंदिवस वारीमध्ये युवक-युवतींचा सहभाग वाढत असून या वारीतही उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण लक्षणीय होते. लातूर येथील संदीप बोराडे नामक युवक अनेक वर्षांपासून वारी करत असून दरवर्षी सामाजिक संदेश देतो. यावर्षीही वृक्षलागवडीचा संदेश देत पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. यावर्षी दुचाकीवरून वारीदरम्यान सासवड येथे हजार देशी झाडे लावण्याचा संकल्प त्याने केला असून या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही त्याच गावातील तरुणांवर सोपवून वृक्षसंवर्धन करणार आहेत. तरुणांनीही याकामी पुढे यावे व पर्यावरणाचे संवर्धन करावे,  असे आवाहन त्यांनी केले आहे.

अपंग विद्यालयाच्या दिंडीला तीस वर्ष पूर्ण 

महाराष्ट्रातील जनतेला सुख समृध्दी मिऴावी, भरपूर पाउस पडावा तसेच शेतकर्‍याीं आत्महत्या करु नये यासाठी यमुनानगर येथील अपंग विद्यालयाच्या वतीने दिंडी काढण्यात आली. या दिंडीला यावर्षी तीस वर्षे पुर्ण झाली. दिंडीत शाळेचे पंचवीस ते तीस विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी दुष्काळ हटू दे, समृध्दी नांदू दे अशा उत्साहपूर्ण घोषणा देत दिव्यांग व्यकितचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. अपंग व्यक्तींचा उत्साह वाढावा यासाठी हि दिंडी काढण्यात येत असल्याचे यावेळी विश्‍वनाथ वाघमोडे यांनी सांगितले. दिंडीत नवनाथ वाघमोडे, कौशल्या हिवसरे, विवेक वाघमोडे आदीनी परिश्रम घेतले. 

वरुणराजाने केले तुकोबारायांचे स्वागत 

निगडीतील भक्ती-शक्ती चौकात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने भक्तिमय वातावरण झालेले असताना  वरुणराजाने  सरींची बरसात करून तुकोबारायांचे स्वागत केले. यावेळी वारकर्‍यांसह भक्तगण पावसात न्हाऊन निघाले. 

शहरात पहिल्यांदाच साहित्यिकांची दिंडी

साहित्य संवर्धन समिती व पिंपरी चिंचवड साहित्य मंचच्या वतीने जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहूरोड ते आकुर्डीदरम्यान शहरातील साहित्यिक व कवी या दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी हातात पर्यावरणसंवर्धनाचे संदेश देणारे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी साहित्यिकांनी संत तुकाराम तसेच वारकरी आणि पारंपरिक वेश धारण करून पर्यावरणाचा संदेश दिला. साहित्यिकांच्या वारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.